मोदी म्हणजे, India's Divider In Chief; टाईमच्या कव्हर फोटोवरून गोंधळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

आंतरराष्ट्रीय मासिक 'टाईम'नं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच 'भारताला विभागणारा प्रमुख' असा करण्यात आला आहे. यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय मासिक 'टाईम'नं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच 'भारताला विभागणारा प्रमुख' असा करण्यात आला आहे. यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींच्या कारभारावर जोरदार टीका करताना मासिकानं नेहरुंचा समाजवाद आणि भारतातली सध्याची सामाजिक परिस्थिती यांची तुलना केली आहे. हिंदू आणि मुस्लिमांमधला बंधूभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केलं नाही, अशी टीका टाईमच्या लेखातून करण्यात आली आहे. आतिश तासीर यांनी हा लेख लिहिला असून 'नरेंद्र मोदींनी महान राजकीय व्यक्तीमत्त्वांवर हल्ले चढवले. ते काँग्रेसमुक्त भारताबद्दल बोलतात, त्यांनी काय केले ते सांगावे, अशा शब्दांमध्ये टाइमनं मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. 

या लेखातून भारतीय संस्कृतीवरदेखील भाष्य करण्यात आलं आहे. 'भारताच्या कथित उदार संस्कृतीची चर्चा केली जाते. मात्र मोदींचं सत्तेत येणं या संस्कृतीत धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमांविरोधातली भावना आणि जातीय कट्टरता किती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे ते दाखवतं,' असे या लेखात म्हटले आहे. या लेखात 1984 मधील शिखविरोधी दंगल आणि 2002 मधील गुजरात दंगलीचा उल्लेख आहे. 'काँग्रेस नेतृत्व 1984 च्या दंगलीतल्या आरोपांपासून मुक्त नाही. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला उन्मादी गर्दीपासून दूर ठेवलं. पण 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना मोदी शांत बसले. त्यांचं हेच मौन दंगल घडवणाऱ्यांच्या पथ्यावर पडलं,' अशी टीकाही टाईमनं केली आहे.

दरम्यान, टाईम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?' या शीर्षकाखाली टाईम या मासिकानं हा लेख प्रसिद्ध केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TIME puts PM Narendra Modi on cover calls him divider in chief