पंतप्रधानपदाबाबत नंतर बघू : ममता बॅनर्जी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

कोलकता येथे 19 जानेवारीला होणाऱ्या विरोधी पक्षांच्या सभेचे निमंत्रण देण्यासाठी आज दिल्लीमध्ये ममतांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली. यात सोनिया गांधी, राहुल गांधी, लालकृष्ण अडवानी, संजय राऊत आदी नेत्यांना भेटून त्यांनी निमंत्रण दिले. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या एकजुटीची चर्चा सुरू असताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात कुतुहल वाढले आहे.

नवी दिल्ली : भाजपचा पराभव हे पहिले उद्दिष्ट असून, त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. भाजपशी लढण्यासाठी आपापल्या राज्यात मजबूत असलेल्या पक्षाला इतरांनी पाठिंबा द्यावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे. 

कोलकता येथे 19 जानेवारीला होणाऱ्या विरोधी पक्षांच्या सभेचे निमंत्रण देण्यासाठी आज दिल्लीमध्ये ममतांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली. यात सोनिया गांधी, राहुल गांधी, लालकृष्ण अडवानी, संजय राऊत आदी नेत्यांना भेटून त्यांनी निमंत्रण दिले. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या एकजुटीची चर्चा सुरू असताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात कुतुहल वाढले आहे. दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या ममता यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती; तर आज संसद भवन परिसरात त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानींची भेट घेतली. त्याचप्रमाणे शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत यांना भेटून सभेचे निमंत्रण दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हे निमंत्रण सुपूर्त केले जाणार असल्याचे राऊत यांनी या भेटीनंतर सांगितले. याखेरीज ममता बॅनर्जी या माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केरळ कॉंग्रेसचे खासदार जोस के. मणी, लोकसभेचे उपाध्यक्ष व एआयएडीएमकेचे नेते थंबी दुराई, तेलुगू देसम पक्षाचे खासदार वाय. एस. चौधरी आदी नेत्यांनाही भेटल्या. सायंकाळी सोनिया गांधी यांची "10 जनपथ' या निवसस्थानी जाऊन भेट घेतली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील या वेळी उपस्थित होते. अर्धा तास चाललेल्या या भेटीमध्ये विरोधी ऐक्‍य, निवडणूक तयारीवर चर्चा झाली. 

पंतप्रधानपदाबाबत नंतर बघू 
या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) मसुद्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. मात्र पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपला पराभूत करण्याचे आपले पहिले उद्दिष्ट असून, ते पूर्ण होऊद्या. त्यानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र बसून यावर निर्णय करतील, अशी टिप्पणी ममता बॅनर्जींनी केली. भाजपशी लढत देताना जो ज्या राज्यात मजबूत आहे त्याला इतरांनी पाठिंबा द्यावा, अशी सोनिया, राहुल यांच्यासमवेत चर्चा झाल्याचे त्या म्हणाल्या. 

Web Title: TMC leader Mamata Banerjee talked about BJP defeat