शनिवारी 2 वाजता निर्णय देईन; महिला खासदाराच्या FB पोस्टमुळे तृणमूलच्या अडचणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

जसजशा पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

बीरभूम : जसजशा पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आता बीरभूम मतदारसंघातील टीएमसीच्या खासदार असलेल्या अभिनेत्री शताब्दी रॉय यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे असे संकेत दिले आहेत की, पक्षातील काही लोक त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत त्या महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊ शकतात, यासाठी त्यांनी 16 जानेवारी दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ देखील निश्चित केला आहे. 

शताब्दी यांनी म्हटलंय की, लोक मला विचारतात की मी बीरभूममध्ये होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित असलेली का दिसत नाही? मी कशी सामील होणार जर मला त्यांचं वेळापत्रकच नसेल माहिती? मला वाटतंय की काही लोकांची इच्छा आहे की मी तिथे असू नये. पोस्टमध्ये पुढे त्यांनी म्हटलं आहे की, या नव्या वर्षात मला तुमच्यासोबत राहता यावं यासाठी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न मी करत आहे. 2009 सालापासून तुम्ही मला पाठिंबा दिल्याबद्दल तसंच मला लोकसभेत पाठवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. भविष्यातही तुमचं हे प्रेम मला मिळत राहील अशी आशा आहे. मी खासदार होण्याआधीही बंगालच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं. मी माझं कर्तव्य पार पाडत राहणार आहे. जर मी निर्णय घेतला तर 16 जानेवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत कळवेन.

हेही वाचा : या देशात प्रत्येकजण संशयखोर का? भारत बायोटेकच्या चेअरमन्सचा सवाल

टीएमसीच्या सुत्रांचं म्हणणं आहे की, 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर बीरभूमच्या खासदार जिल्ह्यात आयोजिक केलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात क्वचितच  दिसल्या. 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बीरभूममध्ये आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमात त्या शेवटचं दिसून आल्या होत्या. या रॅलीमध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यांना योग्य ते महत्त्व दिलं होतं तसेच अनेकदा त्यांचं नाव देखील घेतलं होतं.
हे आहे नाराजीचं कारण
पक्षातील सुत्रांचं म्हणणं असं आहे की, जेंव्हापासून शताब्दी रॉय यांनी खासदार निधीचे पैसे जनतेमध्ये वाटले आहेत तेंव्हापासून स्थानिक नेते त्यांच्यावर नाराज आहेत. नाराजीचं कारण असं आहे की, असं करताना त्यांनी विकास कामांची निवड करताना पक्षाचा सल्लादेखील घेतला नाहीये.
2009 पासून बीरभूमच्या खासदार
शताब्दी रॉय यांनी 2009 साली टीएमसीच्या तिकीटावर बीरभूममधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्या 2014 तसेच 2019 मध्येही जिंकल्या. याशिवाय त्या बंगाली सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका देखील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tmc mp shatabdi roy fb post drawn tension in Trinmool congress party mamata banerjee