शताब्दी रॉय यांना मिळाली 'ममता'; पक्ष सोडण्याच्या धमकीनंतर झालं प्रमोशन

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 18 January 2021

दोन दिवसांच्या नाट्यमय घटनांनंतर तृणमूल काँग्रेसकडून (Trinamool Congress) ही घोषणा करण्यात आली आहे.

कोलकाता- तृणमूल काँग्रेसच्या तीनवेळा खासदार राहिलेल्या शताब्दी रॉय (TMC MP Shatabdi Roy) यांना बंगाल राज्य पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या नाट्यमय घटनांनंतर तृणमूल काँग्रेसकडून (Trinamool Congress) ही घोषणा करण्यात आली आहे. अन्य नेत्यांप्रमाणे शताब्दी रॉयही भाजपमध्ये सामील होतील अशी चर्चा होती. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

बर्ड फ्लू..! सात पथकांद्वारे जंगलगी परिसरातील 756 पक्षी व 110 अंडी नष्ट;...

रॉय यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय की, ते या निर्णयाचं स्वागत करतात आणि येत्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाईल. अभिनयातून राजकारणात आलेल्या शताब्दी रॉय यांनी म्हटलं की, जर आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आपल्या समस्या ठेवतो, तेव्हा त्याचे समाधान केले जाते. 

शताब्दी रॉय यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत तृणमूल काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले होते. नवी दिल्लीला जाण्याआधी पार्टीचे नेता अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी आपला सूर बदलत तृणमूल काँग्रेस सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. 

पार्टीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मला बोलावलं जात नव्हतं. त्यामुळे मी मानसिकरित्या व्यथित होते. शताब्दी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना भेटल्यानंतर शताब्दी रॉय यांनी विचार बदलला. मी ममता बॅनर्जी यांच्यासाठी राजकारणात आले होते आणि त्यांच्यासोबत राहिन, असं त्या म्हणाल्या.

सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या; अफगाणिस्तानमधील...

बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. जे.पी.नड्डा, अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर बंगालचे राजकीय वातावरण तापले असून भाजपमध्ये ‘इनकमिंग’ची संख्या वाढल्याने तृणमूलच्या गोटात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, आपल्या बीरभूम मतदारसंघातील पक्षाच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागला, असे रॉय यांनी फेसबुकवरील पोस्ट मध्ये म्हटले होतं. यासंदर्भात कोणता निर्णय घेतला तर शनिवारी दुपारी दोन वाजता आपण जनतेला जाहीर करू, असे तीनवेळा बीरभूमच्या खासदार राहिलेल्या रॉय यांनी शुक्रवारी दिल्लीला जाताना सांगितले होते. त्यामुळे त्या भाजपमध्ये सामिल होतील अशी चर्चा सुरु झाली होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMC MP Shatabdi Roy get important post in Trinamool Congress