जिल्हा मागणीसाठी आज चिक्कोडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा घोषणा करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १४) शहर बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा मागणी आंदोलन समिती व विविध संघटनांच्या वतीने बंदचे हत्यार उपसले आहे.

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा घोषणा करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १४) शहर बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा मागणी आंदोलन समिती व विविध संघटनांच्या वतीने बंदचे हत्यार उपसले आहे. जिल्हा मागणीची तीव्रता व त्याची झळ राज्य सरकारला पोहोचविण्यासाठी बंदमध्ये संपूर्ण शहराने सहभाग घ्यावा. तसेच शहर व परिसरातील नेते, संघटना व नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलन समितीच्या वतीने बी. आर. संगाप्पगोळ यांनी केले आहे.

श्री. संगाप्पगोळ म्हणाले, ‘‘गेल्या २५ वर्षांपासून ही मागणी करण्यात येत असली तरी राजकीय नेत्यांनी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनात नेहमी आडकाठी आणली आहे. ज्यांना जनता निवडून राजकीय सत्ता देते त्यांच्या मागणीचाच अनादर होत आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन असून त्यात सर्वांनी स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे. तसेच जिल्हा मागणीच्या आंदोलनाची तीव्रता दाखवू द्यावी.’’  

राज्यातील आजी व माजी मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्हा विभाजन व चिक्कोडी जिल्हा निर्मितीसाठी हिरवा कंदील दाखविला आहे. पण जिल्ह्यातील नेत्यांनी पुढे येऊन हा प्रस्ताव मांडण्याची आवश्‍यकता आहे. पण जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला नाही.

यावरून त्यांना चिक्कोडी जिल्हा व्हावा असे वाटत नसल्याचे स्पष्ट होते. त्यांना चपराक देण्यासाठी जनतेनेच रस्त्यावर उतरून आपली शक्ती दाखविण्याची गरज आहे. चिक्कोडी शहरातील सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालये, संस्था, दुकाने बंद ठेवून नागरिकांनी जिल्हा मागणीची तीव्रता वाढवावी. शहर व परिसरातील नागरिकांनीही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही संगाप्पगोळ यांनी केले आहे.

Web Title: Today Chikodi Bandh for demand of District