पाकने अखेर गुडघे टेकले, आज अभिनंदन भारतात परतणार!

abhinandan
abhinandan

नवी दिल्ली : प्रत्यक्ष सीमेवर आणि हवेतही ठोसे खाल्ल्यानंतर पाकिस्तानातील "इम्रान'शाहीने काल भारतासमोर गुडघे टेकत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज (ता. 1) बिनशर्त सुटका करण्याची घोषणा केली. भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकच्या हद्दीत कोसळले होते, त्यानंतर तेथील सैनिकांनी त्यांना कैद केले होते. अभिनंदन यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आधीच तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानी लष्कराला आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत अखेर त्यांची सुटका करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. 

भारतानेही अभिनंदन यांच्या सुटकेसाठी पाकसोबत कसलीही तडजोड केली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. वर्धमान यांच्या सुटकेसाठी सौदेबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा सज्जड दमच भारताने भरला होता. भारत सरकारची आक्रमक भूमिका आणि अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्ससारखे देश विरोधात गेल्याने पाकची पुरती कोंडी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांना आज पाकच्या संसदेतच विंग कमांडर अभिनंदन यांची आज (ता.1) रोजी सुटका करण्याची घोषणा केली. शांतता प्रक्रियेचे एक पाऊल पुढे पडावे म्हणून आम्ही वर्धमान यांची सुटका करत आहोत, असा साळसूदपणाचा सूरही त्यांनी आळवला. 

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना पुन्हा भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला, आम्हाला युद्ध नको आहे, त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती; पण पाकिस्तानच्या चर्चेच्या प्रस्तावाला कोणीही कमजोरी समजू नये, अशी टिमकीही त्यांनी या वेळी वाजविली. तत्पूर्वी पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी उभय देशांतील तणाव कमी करण्यासाठी इम्रान हे भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते, यानंतर काही तासांमध्येच संसदेच्या संयुक्त अधिवेशनात इम्रान यांनी अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे अन्य खासदारांनीही बाके वाजवून स्वागत केले. याआधी भारतानेही वर्धमान यांच्या सुटकेसाठी बुधवारी पाक उच्चायुक्तांना बोलावून घेत त्यांना समन्स बजावले होते. 

पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न 
भारतीय हवाईदलाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरदेखील पाकिस्तानच्या हवाई कुरापती गुरुवारीही सुरूच होत्या. पाकची लढाऊ विमाने हल्ल्याच्या इराद्याने आज काश्‍मीरमध्ये घुसली होती; पण भारतीय हवाई दलाने त्यांना पुन्हा पिटाळून लावले. पाकिस्तानातील इम्रान सरकार भारताकडे चर्चेचा प्रस्ताव ठेवत असताना त्यांची लढाऊ विमाने मात्र भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

काल दिवसभरात 
सौदी अरेबियाचे राजदूत पंतप्रधान मोदींना भेटले 
भारताने सीमेवरील तणावाची माहिती दहा देशांना दिली 
सुरक्षा सल्लागार दोवाल यांची "आयबी', "रॉ' प्रमुखांशी चर्चा 
पाकिस्तानी "एअरस्पेस' विमानांच्या उड्डाणांसाठी खुली 
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमेवर पुन्हा तणाव 
विंग कमांडर वर्धमान यांचे व्हिडिओ काढण्याचे यू ट्यूबला आदेश 
"ओआयसी'च्या व्यासपीठावर भारताशी चर्चा नाही : पाकिस्तान 
पाकिस्तानकडून "समझौता एक्‍स्प्रेस'ची सेवा तात्पुरती रद्द 
पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी : जपान 
भारत, पाकिस्तानने लष्करी संघर्ष टाळावा : पेंटागॉन 
मसूद अझरविरोधात ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका भारताच्या पाठीशी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com