जैशे महंमदचा म्होरक्‍या उमर खालिद संयुक्त कारवाईत ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

चकमक सुरू होताच जवानांनी आणखी कुमक मागवत सर्व बाजूंनी नाकेबंदी केली. यामुळे दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे मार्ग रोखले गेले. या गोळीबारातच खालिद मारला गेला

श्रीनगर - जैशे महंमदचा म्होरक्‍या उमर खालिद याला आज जवानांनी चकमकीत ठार करत या भागातील दहशतवाद्यांना मोठा दणका दिला. लष्करी ठाण्यांवर हल्ले करणे, पोलिसांना लक्ष्य करणे, अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये उमर खालिदचा सहभाग होता.

जम्मू काश्‍मीर पोलिसांचे विशेष कृती पथक, स्थानिक पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि लष्कराच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. उत्तर काश्‍मीरमधील लाडूरा भागामध्ये दहशतवादी असल्याची माहिती खबऱ्यांकडून समजल्यानंतर जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. चकमक सुरू होताच जवानांनी आणखी कुमक मागवत सर्व बाजूंनी नाकेबंदी केली. यामुळे दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे मार्ग रोखले गेले. या गोळीबारातच खालिद मारला गेला. श्रीनगर विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या बटालियनवर आणि पुलवामामधील पोलिस वसाहतीमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील खालिदच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे.

खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता. उत्तर काश्‍मीरमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कारवाया करत होता. तसेच, जैशे महंमद संघटनेमध्ये तरुणांना फूस लावून भरती करून घेण्याचे कामही तो करत होता. काही दिवसांपूर्वी हंडवाडामध्ये विशेष पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलावर खालिदनेच हल्ला घडवून आणला होता. खालिद हा ए प्लस प्लस (मोस्ट वॉंटेड) वर्गातील दहशतवादी होता. त्याच्यावर सात लाख रुपयांचे इनाम होते.

जवान हुतात्मा
दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. सुभेदार राजकुमार असे या जवानाचे नाव आहे. बडगाममधील खाग भागात ही चकमक झाली.

Web Title: Top Jaish terrorist Khalid killed in encounter in J&K