कर्नाटकातील जोग फाॅल्सकडे पर्यटकांचा आेढा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

बेळगाव - भारतातील सर्वात उंचीवरून कोसळणारा जोग फॉल्स धबधबा यंदा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. यामुळे पर्यटकांनी सहलीसाठी आता जोगफॉल्सला प्राधान्य दिले आहे. ​

बेळगाव - भारतातील सर्वात उंचीवरून कोसळणारा जोग फॉल्स धबधबा यंदा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. यामुळे पर्यटकांनी सहलीसाठी आता जोगफॉल्सला प्राधान्य दिले आहे. राज्यात झालेलेल्या दमदार पावसामुळे लिंगनमक्की जलाशयावर असणारा हा फॉल्स मागील अनेक वर्षानंतर प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात कोसळत असून अमेरीकेच्या नायगारा फॉल्सची झलक जोगफॉल्सवर पहावयास मिळत आहे. 

राजा, राणी, रॉकेट आणि रोअरर हे चार धबधबे याठिकाणी प्रवाहित झाले आहेत. धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटवरून पर्यटकांनी चित्रीत केलेले फोटोज आणि व्हीडीओज सामाजिक संकेतस्थळावरून शेअर करण्यास सुरवात केली असून शिमोग्यात झालेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम आहे. 13 ऑगस्टपासून धबधब्यात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्याआधी दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लिंगनमक्की जलाशय भरले आहे.

1964 साली जलाशयाचे बांधकाम झाल्यानंतर आतापर्यंत 13 वेळा जलाशय भरले असून यापूर्वी 2014 साली जलाशय भरले होते. मात्र, इतक्‍या वर्षात यंदा प्रथमच हे जलाशय अधिक क्षमतेने भरले असून धबधब्यातून कोसळणारे पाण्याचे तुषार पर्यटकांसाठी बांधण्यात आलेल्या व्ह्यूपॉईंटपर्यंत उडत आहेत. 

एक नजर

  • बेळगाव-हुबळी-शिर्सीमार्गे 270 किमी 
  • बेळगाव-अळणावर-शिर्सीमार्गे :242 किमी 
  • रस्तेमार्गाने लागणारे अंतर : 5.20 तास 
Web Title: Tourists visit Jog Falls in Karnataka