Tractor Parade: दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; आक्रमक शेतकरी सिंघू, गाझीपूर सीमेकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर्स परतीच्या मार्गावर आहेत.

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय. यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात आली. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये संघर्षाचं वातावरण पहायला मिळालं. दिल्ली पोलिस आणि शेतकरी आंदोलक यांच्यात हिंसक संघर्ष पहायला मिळाला. नियोजित मार्गावरुन जाण्यावरुन गोंधळ उडाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करत सरतेशेवटी लाल किल्ल्याचा ताबा घेत त्यावर झेंडा फडकवला. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर्स परतीच्या मार्गावर आहेत.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली एनसीआर भागातील सिंघु, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक आणि नांगलोई भागात  इंटरनेट सेवा सध्या तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद करुन काही मार्गावरील ट्राफिक वळवण्यात आले आहे. लाल किल्ल्यावर चढेलल्या शेतकऱ्यांना तिथून हटवण्यात आलं आहे. आणि आता शेतकरी पुन्हा सिंघू आणि गाझीपूर सीमेकडे रवाना झाले आहेत. टीपेला पोहोचलेला अभूतपूर्व संघर्ष सध्या नियंत्रणात आला असून शेतकरी आता पुन्हा माघारी मार्गस्थ झाले आहेत.

हेही वाचा - Tractor Parade Live : 'हिंसा करणारे राजकीय कार्यकर्ते; आंदोलक नाहीत'; राकेश टिकैत यांचं वक्तव्य

लाखो शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्यांना विरोध करणारी आपली मागणी पुढे रेटली आहेत. जिथे पहावं तिथे शेतकऱ्यांचे तिरंग्यानी सजलेले ट्रॅक्टर पहायला मिळाले होते. दरम्यान हिंसा करणारे लोक हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं वक्तव्य आंदोलनाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केलं आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच, आज घडलेल्या अनपेक्षित आणि अस्विकारार्ह घटनांबद्दल आम्ही खेद आणि निषेध व्यक्त करतो. याप्रकारच्या कृत्यांचे अजिबात समर्थन न करत आम्ही या घटनांचा निषेधच करतो, असं वक्तव्य संयुक्त किसान मोर्चातर्फे करण्यात आलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tractor Parade Situation under control farmers returning to Delhi border again