कानात हेडफोन घालून ट्रॅकवर चालणाऱ्या दोघांना ट्रेनची धडक; मृतदेहांचे झाले तुकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 21 November 2020

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर थरकाप उडवणारा अपघात झाला आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसल्यानं दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दोन्ही तरुणांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. त्याच्या मृतदेहाचे तुकडे शोधून गोळा करण्यात आले. जवळपास 100 मीटर अंतराच्या परिसरात शरिराचे भाग पडले होते. यावेळी अपघातानंतर गर्दी झाल्यानं अर्धा तास रेल्वेही विस्कळीत झाली होती. 

बुऱ्हाणपूरमधल्या बिरोदामध्ये राहणारे इरफान आणि कलीम शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रॅकवरून बुऱ्हाणपूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी कर्नाटक एक्सप्रेस भुसावळवरून लालबाग रेल्वे स्टेशनवर येत होती. तेव्हा रेल्वे ट्रकवरून चालणाऱ्या दोघांनाही ट्रेनची जोराची धडक बसली.

रेप झालाच नाही! DNA मुळे तरुणाची 7 वर्षांनी निर्दोष सुटका; तरुणी देणार नुकसान...

लालबाग रेल्वे स्टेशनला ट्रेन पोहोचल्यानंतर कर्नाटक एक्सप्रेसचा मोटरमनने अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. मोटरमनने दिलेल्या माहितीनुसार दोघेही ट्रॅकवरून चालत होते. तसंच कानात हेडफोन असल्यानं वारंवार हॉर्न वाजवूनही ते ट्रॅकवरून जराही हलले नाहीत. तसंच दुसऱ्या ट्रॅकवरूनसुद्धा ट्रेन येत असल्याचं त्याने म्हटलं. 

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर स्थानिकांनी तरुणांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी मदत केली. दोघांच्या मृतदेहांचे इतके तुकडे झाले होते की ओळखणे कठीण झाले होते. मृतदेहांचे अवशेष गोळा करण्यासाठी वेळ लागल्यानं तोपर्यंत रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. सायंकाळी सात वाजल्यापासून ट्रेन पुन्हा सुरु करण्यात आल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The train hit two people walking on the track with headphones in their ears