तोंडी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत सादर

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

राज्यसभेत या विधेयकावर चार तास चर्चा होणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या शिरगणतीद्वारे झालेल्या मतविभाजनातून फेटाळण्यात आल्या होत्या.

नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज (मंगळवार) राज्यसभेत सादर करण्यात आले. 

राज्यसभेत या विधेयकावर चार तास चर्चा होणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकावर विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या शिरगणतीद्वारे झालेल्या मतविभाजनातून फेटाळण्यात आल्या होत्या. लोकसभेत तृणमूल काँग्रेसने या विधेयकावर चर्चेवेळी सभात्याग केला होता; तर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनीही नंतर सभात्याग करून या विधेयकाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर  लोकसभेत बहुमताच्या जोरावर 303 विरुद्ध 82 मतांनी विधेयक मंजूर करून घेण्यात सत्ताधाऱ्यांना यश मिळाले होते.

आता राज्यसभेत या विधेयकाचा मार्ग खडतर मानला जात आहे. या आधी सोळाव्या लोकसभेत तोंडी तलाकविरोधी विधेयक मंजूर होऊनही राज्यसभेत अडकले होते. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जामिनाची तरतूद करून सरकारने पुन्हा विधेयक लोकसभेत मंजूर केले. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे विधेयक रद्दबातल होऊन त्यावर अध्यादेश आणावा लागला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Triple Talaq Bill tabled in Rajya Sabha