
त्रिपुरा विधानसभेसाठी जाहीर झालेल्या 48 उमेदवारांच्या यादीत 6 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.
Tripura Election : विधानसभेची पहिली यादी जाहीर; भाजपनं मुस्लिमांनाही दिलं तिकीट, 11 महिलांचा समावेश
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी (Tripura Assembly Election) भाजपनं (BJP) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपनं त्रिपुरामध्ये 60 विधानसभा जागा असलेल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत दोन मुस्लिम उमेदवारांचीही नावं आहेत. कालच CPM सोडून भाजपमध्ये दाखल झालेले अल्पसंख्याक चेहरा मुहम्मद मोबेशर अली यांना पक्षानं कैलाशहरमधून उमेदवारी दिलीये. तर, तफजल हुसेन यांना बॉक्सनगरमधून तिकीट देण्यात आलं आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 11 महिलांनाही स्थान देण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक धानपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. प्रतिभा भौमिक या मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) त्यांच्या जुन्या सीट टाउन बोरदोवलीतून निवडणूक लढवणार आहेत, तर त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांना बनमालीपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, बनमालीपूर हे माजी मुख्यमंत्री बिप्लब देव यांची विधानसभा जागा आहे. राजीव भट्टाचार्य यांना बिप्लब देव यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा होती, पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं स्वतःच प्रदेशाध्यक्षांना बिप्लब देव यांच्या बनमालीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिलीये.
6 आमदारांचं कापलं तिकीट
त्रिपुरा विधानसभेसाठी जाहीर झालेल्या 48 उमेदवारांच्या यादीत 6 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. बादरघाट येथील निम्मी मुझुमदार, गोलाघाटी येथील वीरेंद्र किशोर देव वर्मा, नलचार येथील सुभाष दास, माताबारीतील विप्लब घोष, बेलोनिया येथील अरुण चंद्र भौमिक आणि अंबासा येथील परिमल देव वर्मा यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यांच्या जागी नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.