मुसळधार पावसामुळे केरळमध्ये 22 मृत्युमुखी 

पीटीआय
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम (पीटीआय) : केरळमध्ये आज झालेल्या मुसळधार पावसात राज्यभरात किमान बावीस जणांचा मृत्यू झाला. सर्वत्र पाऊस होत असून, धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे अतिरिक्त पाणी धरणांतून सोडून दिले जात असल्याने नद्यांच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. 

इडुक्की येथे दरड कोसळून तेरा जणांचा मृत्यू झाला, तर मलप्पुरम जिल्ह्यात सहा, कन्नूरमध्ये दोन आणि वायनाडमध्ये एकाचा पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. पावसामुळे पर्यटकांनी अधिक उंचावरील पर्यटनस्थळांवर जाऊ नये, असे आवाहन केरळ सरकारने केले आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी परिस्थितीची पाहणी केली असून पूरस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. नद्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याचेही विजयन यांनी सांगितले.

इडुक्की धरणाचे दरवाजे 26 वर्षांनंतर प्रथमच उघडण्यात आले. केरळच्या इतिहासात राज्यातील 22 धरणांचे दरवाजे प्रथमच एकाच वेळी उघडण्यात आले आहेत. इडुक्की धरण परिसरात अतिसावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सरकारने मदतीसाठी लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांना पाचारण केले असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या सहा तुकड्यांची मागणी करण्यात आली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठी वित्तहानीही झाली आहे. मलप्पुरम, कोझीकोडे, वायनाड आणि इडुक्की जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 
 
Web Title: Twenty-two killed in torrential rains in Kerala