सात कोटी बनावट खाती बंद ट्विटरची कारवाई

पीटीआय
रविवार, 8 जुलै 2018

ट्विटरच्या माध्यमातून यूजरला विश्‍वसनीय, खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण माहिती मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - डेल हार्वे, उपाध्यक्ष, ट्विटर 
 

सॅनफ्रान्सिस्को : लोकप्रिय सोशल मीडिया ट्विटरने मे आणि जून महिन्यात सुमारे सात कोटीहून अधिक बनावट खाती बंद केली आहेत. ट्‌विटरवरील बनावट खात्यामार्फत खोट्या आणि सनसनाटी बातम्या व अफवा पसरविल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने ट्विटरने कारवाई केली. 

ट्विटरसंबंधी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्‍टोबर 2017 च्या तुलनेत बनावट खाते बंद करण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेत एका-एका दिवसात दहा दहा लाख बनावट खाती बंद केली आहेत. यादरम्यान ट्‌विटरकडून बनावट खात्यावर कारवाई केली जात नसल्याचे आरोप होऊ लागले होते. त्यामुळे खोट्या बातम्या, अफवा पसरविणाऱ्या पोस्टविरुद्ध कारवाई करण्यासाठी ट्विटरने धोरणात बदल केला आहे. यासाठी कंपनीने नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ट्विटरने मे 2018 मध्ये सुमारे एक कोटी संशयित खाती बंद केली आहेत. संशयित खात्याविरुद्ध ट्विटरने उघडलेल्या मोहिमेचा परिणाम यूजरच्या संख्येवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. एप्रिल ते जून तिमाहीची आकडेवारी अद्याप येणे बाकी असून, त्यात यूजरच्या संख्येत घट दिसण्याची शक्‍यता आहे. 

आकडेवारी 
भारतातील ट्विटर यूजर 
3 कोटी (2018) 
3.44 कोटी (अंदाज 2019) 

 
ट्विटरच्या माध्यमातून यूजरला विश्‍वसनीय, खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण माहिती मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 
डेल हार्वे, उपाध्यक्ष, ट्विटर 

 

Web Title: TWITTER ADDRESSING FAKE ACCOUNTS TAKING TOUGHER ACTION ON ABUSE