ट्विटरची "चिमणी' "बग अटॅक'ने घायाळ ; यूजर्सना पासवर्ड बदलण्याच्या सूचना 

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

"व्हर्च्युअल' जगातील आघाडीची मायक्रो ब्लॉगिंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने आज आपल्या यूजर्सना तातडीने त्यांचा पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले होते. ट्विटरच्या "स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉग'मध्ये एक बग आढळून आला आहे, यामुळे यूजर्सची गोपनीय माहिती चोरीस गेल्याचे कोणतेही पुरावे आतातरी समोर आलेले नाहीत.

नवी दिल्ली : "व्हर्च्युअल' जगातील आघाडीची मायक्रो ब्लॉगिंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने आज आपल्या यूजर्सना तातडीने त्यांचा पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले होते. ट्विटरच्या "स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉग'मध्ये एक बग आढळून आला आहे, यामुळे यूजर्सची गोपनीय माहिती चोरीस गेल्याचे कोणतेही पुरावे आतातरी समोर आलेले नाहीत. भविष्यामध्ये यूजर्सची गोपनीय माहिती सुरक्षित राहावी म्हणून आम्ही त्यांना पासवर्ड बदलण्यास सांगत आहोत, असे ट्विटरच्या अधिकृत हॅंडलवरून स्पष्ट करण्यात आले. 

जगभरात ट्विटरचे 33 कोटी यूजर्स असून, त्या सर्वांचा डाटा सुरक्षित असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, या बगचा नेमक्‍या किती पासवर्डला फटका बसला हे स्पष्ट झालेले नाही. जगभरात विविध देशांतील नियामक संस्था आणि कायदे मंडळे फेसबुक, "उबेर'सारख्या कंपन्यांकडे असलेल्या यूजर्संच्या माहितीच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत असताना ट्विटरवर हा बग अटॅक झाला आहे. अशाप्रकारचा बग अटॅक पुन्हा होऊ नये म्हणून ट्विटरचे व्यवस्थापन आतापासूनच उपाययोजना आखत आहे.  

 
 

Web Title: Twitter has request to change account password