नेहरू-पटेल कॅबिनेटवरून ट्विटर वॉर

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पहिल्या मंत्रिमंडळामध्ये वल्लभभाई पटेल यांना घेण्यास तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उत्सुक नव्हते, असे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केल्यानंतर इतिहासकार रामचंद्र गुहांनी ट्विटरवरून जयशंकर यांच्यावर टीका केल्याने या दोघांमध्ये ‘टि्वटर वॉर’ सुरू झाले आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा यांच्यात आरोप-प्रत्यारोप
नवी दिल्ली - पहिल्या मंत्रिमंडळामध्ये वल्लभभाई पटेल यांना घेण्यास तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उत्सुक नव्हते, असे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केल्यानंतर इतिहासकार रामचंद्र गुहांनी ट्विटरवरून जयशंकर यांच्यावर टीका केल्याने या दोघांमध्ये ‘टि्वटर वॉर’ सुरू झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नारायणी बसू यांनी लिहिलेल्या व्ही. पी. मेनन यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन जयशंकर यांनी बुधवारी रात्री केले. यानंतर जयशंकर यांनी पुस्तकाच्या हवाल्याने टि्वट केले की, ‘‘नेहरू १९४७ मध्ये वल्लभभाई पटेल यांना कॅबिनेटमध्ये घेऊ इच्छित नव्हते आणि त्यांनी कॅबिनेटच्या सुरुवातीच्या यादीतून त्यांचे नाव हटवले होते.’’ जयशंकर यांच्या टि्वटला उत्तर देताना इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले, की हे एक मिथक आहे. प्राध्यापक श्रीनाथ राघवन यांनी यावर एक विस्तारपूर्वक लेख लिहून हे खोटे असल्याचे सिद्धही केले आहे. त्यामुळे ‘फेक न्यूज’ आणि आधुनिक भारताच्या दोन निर्मात्यांमधील शत्रुत्वाच्या खोट्या बातम्या पसरवणे हे परराष्ट्रमंत्र्याचे काम नाही.

आणखी वाचा - सट्टेबाज ते फिक्सर कोण आहे संजीव चावला?

यावर जयशंकर यांनी ट्विट करत उत्तर दिले की, काही परराष्ट्रमंत्री पुस्तकेही वाचतात. हेही असू शकते की काही प्राध्यापकांनाही ही चांगली सवय असेल. जर असे असेल तर मी काल प्रकाशन केलेले पुस्तक वाचावे. यावर पुन्हा रामचंद्र गुहा यांनी ट्विट करत उत्तर दिले की, सर, तुम्ही जेएनयूमधून पीएचडी केली आहे. हे निश्चित आहे की, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पुस्तके वाचली असतील. त्यात नेहरू आणि पटेल यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारावर प्रकाशित सामग्रीही असतील, ज्यात नेहरू कशा पद्धतीने पटेल यांना आपल्या कॅबिनेटमधील मजबूत स्तंभ म्हणून पाहत असत. तुम्हीच पुन्हा एकदा पुस्तक वाचा, अशी माझी विनंती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter war from Nehru Patel on cabinet