जोरदार पावसामुळे ओडिशात दोन बळी

स्मृती सागरिका कानुनगो 
रविवार, 22 जुलै 2018

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशाला पावसाने झोडपून काढले असून, रायगड जिल्ह्यात भिंत कोसळून दोन जण ठार झाले. राजधानी भुवनेश्‍वरसह कटक आणि पुरी या मोठ्या शहरांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्याच्या काही भागांत नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. कंधमाल जिल्ह्यातील कोटागड येथे रस्ते आणि बांध वाहून गेल्याने वाहतूक थंडावली आहे. नुकसानग्रस्त भागांत त्वरित मदतकार्य सुरू करण्याचा आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिला आहे. 

भुवनेश्‍वर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशाला पावसाने झोडपून काढले असून, रायगड जिल्ह्यात भिंत कोसळून दोन जण ठार झाले. राजधानी भुवनेश्‍वरसह कटक आणि पुरी या मोठ्या शहरांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्याच्या काही भागांत नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. कंधमाल जिल्ह्यातील कोटागड येथे रस्ते आणि बांध वाहून गेल्याने वाहतूक थंडावली आहे. नुकसानग्रस्त भागांत त्वरित मदतकार्य सुरू करण्याचा आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिला आहे. 

भुवनेश्‍वरला पावसाचा फटका बसला असून, अनेक निवासी भागांत पाणी शिरले आहे. महापालिकेने पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे ही स्थिती आल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून, विविध विभागांत पाणी घुसल्याने महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. कटकच्या सखल भागातील वसाहतींना पावसाचा फटका बसला. गटारांतील पाणी रस्त्यांवर आल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती.

कटकच्या रहिवाशांनीही महापालिकेविरुद्ध संताप व्यक्त केला. आणखी पावसाच्या अंदाजामुळे भुवनेश्‍वर आणि कटकमधील शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय करण्यात आला आहे. पुरीतही पावसाने धुमाकूळ घातला असून, जिल्ह्यातील ब्रह्मगिरी येथील अलारनाथ मंदिरातील धार्मिक कार्यक्रम स्थगित करावे लागले. भुवनेश्‍वर आणि खुर्दा रोड स्थानकांमध्ये पाणी साचल्याने पूर्व किनारी रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तसेच काही गाड्यांचे मार्ग बदलावे लागले आहेत. मयूरभंज आणि बालासोर जिल्ह्यांत विजा कोसळून काल सात जण मृत्युमुखी पडले. 

Web Title: Two dead in Odisha due to heavy rains