दोन दशकांपूर्वीच 'ती'चे सीमोल्लंघन ; 'शबरीमला'त केला होता प्रवेश

दोन दशकांपूर्वीच 'ती'चे सीमोल्लंघन ; 'शबरीमला'त केला होता प्रवेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील शबरीमलातील अय्यप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सुमारे दोन दशके आधी एका महिला आयएएस अधिकाऱ्याने बंदी झुगारत एकदा नव्हे, तर तब्बल चार वेळा प्रवेश केला होता. सरकारी कामकाजाचा भाग म्हणून या महिला अधिकारी मंदिरात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना कर्मठ लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोधही केला होता. मात्र, मंदिरात प्रवेशासाठी खुद्द केरळ उच्च न्यायालयाने संबंधित अधिकारी महिलेला परवानगी दिली होती. 

दहा ते 50 वयोगटाच्या महिलांना शबरीमलातील मंदिरात प्रवेशास बंदी असूनही धाडसी आयएएस अधिकारी के. बी. वलसाला कुमारी यांनी दोन दशकांपूर्वी मंदिरात प्रवेश केला होता. केरळमधील पत्तनमत्तिट्टा जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या वलसाला कुमारी यांनी 1994 ते 95 या कालावधीमध्ये विरोध झुगारून देत एकदा नव्हे, तर चार वेळा मंदिरात प्रवेश करून आपले कर्तव्य पार पाडले होते. त्या वेळी वलसाला कुमारी यांचे वय 41 वर्षे होते. बंदी असली तरी मंदिरात दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यात्रेसाठीच्या तयारीसाठी विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठी वलसाला कुमारी यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी केरळ उच्च न्यायालयाने दिली होती. सरकारी कामकाजाचा भाग म्हणून त्यांना परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मंदिरातील पवित्र 18 सोनेरी पायऱ्यांवर चढू नये, असेही वलसाला कुमारी यांनी न्यायालयाने बजावले होते. 

मी मंदिराला भेट दिली होती त्या वेळी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडून असल्याचे दिसून आले. त्यानंतर या परिसरात मोठी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश मी दिले होते, अशी आठवण वलसाला कुमारी यांनी सांगितली. शबरीमला येथील मंदिरात सर्व वयाच्या महिलांना मुक्त प्रवेशाचा अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com