esakal | लशीमुळे मृत्युचा धोका कमी; ICMR चा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

लशीमुळे मृत्युचा धोका कमी; ICMR चा दावा

लशीमुळे मृत्युचा धोका कमी; ICMR चा दावा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस ही कोविड योद्धांसाठी प्रभावी ठरल्याचे निष्कर्ष समोर आला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासातून लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका ९५ टक्के, तर एक डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका ८२ टक्क्यांनी घटल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ‘आयसीएमआर’ने यासंबंधी ‘ट्विट’ करून माहिती दिली आहे. आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिलॉजी आणि वेल्लार येथील ख्रिश्‍चन वैद्यकीय महाविद्यालयाने हा अभ्यास केला आहे. त्यासाठी तमिळनाडू पोलिस दलातील पोलिसांची मदत घेण्यात आली. हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

तमिळनाडूमधील एक लाख १७ हजार ५२४ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ३२ हजार ७९२ जणांनी १ फेब्रुवारी ते १४ मे या काळात लसीचा एक डोस, तर ६७ हजार ६७३ जणांनी दोन डोस घेतले. उर्वरित १७ हजार ५९ जणांनी एकही डोस घेतला नाही. याचा दाखला देत ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे, की १३ एप्रिल ते १४ मे या काळात ३१ मृत्यू झाले. त्यातील चौघांनी दोन्ही डोस घेतले होते, सात जणांनी एक डोस घेतला होता, तर २० जणांनी एकही डोस घेतलेला नव्हता. यातून लसीचा प्रभावीपणा हा दोन डोस घेतल्यानंतर ९५ टक्के, तर एक डोस घेतल्यानंतर ८२ टक्के आहे.

हेही वाचा: राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान

सहव्याधी, संसर्गाचा विचार नाही

लसीचा प्रभावीपणाचा अभ्यास करताना मिळविलेले आकडे हे एकत्रित आहेत. यात वय, सहव्याधी, कोरोनाचा आधी संसर्ग झाला होता का, याचा विचार करण्यात आलेला नाही. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणत्या कंपनीची लस घेतली होती, याचाही विचार केला गेला नाही, या आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लस घेण्याची गरजही व्यक्त केली आहे.

loading image