भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरु ठेवली. अखेर सुरक्षा रक्षकांनी दहशतवादी लपलेले घरच उडवून देत उद्ध्वस्त केले. यात जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल गाझी याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुतात्मा करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला आहे. दहशतवादी लपलेले घरच लष्कराने उडवून देत नया हिंदुस्तानची झलक दाखविली आहे. भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेत जैशे महंमदचा म्होरक्या अब्दुल रशीद गाझी याच्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले.

पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर केलेल्या गोळीबारात मेजरसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. तर, या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. पिंगलान भागात रविवारी मध्यरात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु होती. पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शोधमोहिम राबविली असता दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एका मेजरसह तीन जवान हुतात्मा झाले. तर, एका नागरिकाचाही म़ृत्यू झाला आहे. 

सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरु ठेवली. अखेर सुरक्षा रक्षकांनी दहशतवादी लपलेले घरच उडवून देत उद्ध्वस्त केले. यात जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल गाझी याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

गाझी हा अफगाण युद्धात लढलेला असून आयईडी स्फोटकांचा तज्ज्ञ आहे. त्यानेच पुलवामाचा हल्लेखोर आदिल दार याला प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझी ऊर्फ रशीद अफगाणी हा काही दिवसांपूर्वी झालेल्या एका चमककीत थोडक्‍यात बचावला होता. जैशे महंमदचा प्रमुख मसूद अझरच्या सर्वांत विश्‍वासू सहकाऱ्यांपैकी गाझी हा एक आहे. त्याला तालिबानने प्रशिक्षण दिले आहे. 2011 मध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये आल्यानंतर तो दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये मार्गदर्शन करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मसूद अझरचा पुतण्या चकमकीत मारला गेल्यानंतर या घटनेचा बदला घेण्यासाठी गाझीला काश्‍मीर खोऱ्यात पाठविण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Jaish-e-Mohammed terrorists eliminated in successful operation to hunt down conspirators of Pulwama Attack