अन् खाण कामगार झाले क्षणार्धात कोट्याधीश

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचे नशीब उजळले आहे. झळाळत्या हिऱ्यामुळे त्यांच्या जीवनाला भरभराटीचा पैलू पडला आहे. खाणीत काम करताना या मजुरांना सापडलेला हिरा लिलावात तब्बल 2.55 कोटी रुपयांना विकला गेला आहे.

भोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचे नशीब उजळले आहे. झळाळत्या हिऱ्यामुळे त्यांच्या जीवनाला भरभराटीचा पैलू पडला आहे. खाणीत काम करताना या मजुरांना सापडलेला हिरा लिलावात तब्बल 2.55 कोटी रुपयांना विकला गेला आहे.

पन्नातील हिऱ्यांच्या खाणीत खाणकाम करीत असताना मोतीलाल व रघुवीर प्रजापती या मजुरांना 9 ऑक्‍टोबरला एक दगड सापडला. तो त्यांनी नियमानुसार जिल्हा हिरा अधिकाऱ्याकडे जमा केला. हा दगड म्हणजे पन्नातील खाणीत सापडलेल्या सर्वांत मोठ्या व मौल्यवान हिऱ्यापैकी एक आहे. या पूर्वी 44.55 कॅरेटचा सर्वांत मोठा हिरा 1961 मध्ये पन्नात सापडला होता. मजुरांना सापडलेल्या हिऱ्याचा लिलाव शुक्रवारी (ता. 28) करण्यात आला. झाशी येथील सोन्याचे व्यापारी राहुल जैन व बहुजन समाज पक्षाचे नेते चरण सिंह यांनी सहा लाख प्रतिकॅरेटनुसार बोली लावत हिरा खरेदी केला. पन्नातील लिलावातील सर्वांत किंमत मोठी आहे. 42.9 कॅरेट वजन असलेल्या या हिऱ्यासाठी त्यांनी एकूण किंमत 2.55 कोटी रुपये मोजले, अशी माहिती हिरा अधिकारी संतोष सिंह यांनी दिली.

खरेदीदारांनी किमतीच्या 20 टक्के रक्कम धनादेशाने भरली आहे. उर्वरित रक्कम हिरा त्यांच्या ताब्यात आल्यानंतर मिळणार आहे. या लिलावाच्या वेळी मोतीलाल व प्रजापती हजर नव्हते. सायंकाळी त्यांना याबाबत माहिती मिळाली. हिऱ्याच्या किमतीमधून 12 टक्के रॉयल्टी व अन्य कराची रक्कम कापून प्रजापतीच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. अशा प्रकारे दोन्ही मजुरांना एका महिन्यानंतर 2.30 कोटी मिळणार आहेत.

दरम्यान, लिलावात हिरा खरेदी केलेले चरण सिंह हे आगामी लोकसभा निवडणूक "बसप'कडून पन्ना मतदारसंघातून लढविण्याचा विचार करीत आहेत. त्यांचे सहकारी व सराफ व्यापारी राहुल जैन यांच्या व्यवसायाची दर वर्षी 300 ते 400 कोटींची उलाढाल आहे. या लिलावात देशभरातील नागरिक सहभागी झाले होते. 

नशीब अजमाण्यासाठी... 
पन्ना जिल्ह्यातील 8 मीटर बाय आठ मीटर एवढ्या लहान आकारमानाची हिऱ्याची खाण जिल्हा प्रशासनाकडून माफक भाडेतत्त्वावर घेऊन अनेक गरीब व श्रीमंत लोक आपले नशीब अजमावत असतात. खाणकाम करताना जर हिरा सापडला, तर तो जिल्हा अधिकाऱ्याकडे जमा करावा लागतो. कालांतराने लिलावात त्याची विक्री केली जाते. 

हिऱ्याला मिळालेल्या किमतीविषयी सायंकाळी समजले. मिठाई वाटून व प्रार्थना करून हा आनंद आम्ही साजरा केला. या रकमेमुळे आम्हाला आमच्या मुलांना चांगले शिक्षण देता येईल. रघुवीरला कर्ज फेडण्यासाठी पैशाची नितांत गरज होती. 

Web Title: Two labourers dug one of the biggest diamonds from Pannas shallow mines