पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

चकमकीदरम्यान एका मुलाचा मृत्यू; भारताकडून पाककडे चिंता व्यक्त

नवी दिल्ली: दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या जोरदार चकमकीत लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. पुलवामामधील अवंतीपोरा भागात ही चकमक झाली.

चकमकीदरम्यान एका मुलाचा मृत्यू; भारताकडून पाककडे चिंता व्यक्त

नवी दिल्ली: दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या जोरदार चकमकीत लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. पुलवामामधील अवंतीपोरा भागात ही चकमक झाली.

जहॉंगीर गनाई आणि महंमद शफी ऊर्फ शेर गुजरी असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) सूत्रांनी सांगितले. हे दोन्ही दहशतवादी पुलवामा जिल्ह्यातीलच रहिवासी असून, गेल्या वर्षी एका स्थानिक पोलिसाच्या हत्येमध्येही गनाईचा सहभाग होता. दहशतवाद्यांबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर "सीआरपीएफ' आणि पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. या वेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला.

दहशतवाद्यांनी शरण यावे, यासाठी जवानांनी एका दहशतवाद्याच्या आईलाही तेथे आणून तिच्याद्वारे त्याला आवाहन केले. मात्र, त्याने नकार दिला. यानंतर सुमारे नऊ तासांच्या चकमकीनंतर दोन्ही दहशतवादी मारले गेले. दहशतवादी लपले असल्याच्या ठिकाणापासून जवळच रेल्वे मार्ग असल्याने या मार्गावरून जाणारी बनिहाल-बारामुल्ला रेल्वेही थांबविण्यात आली होती. भारताचे लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए. के. भाटिया यांनी पाकिस्तानमधील आपल्या समकक्ष अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत दहशतवाद्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत काळजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, चकमक सुरू असताना अमीर नाझरी (वय 15) या मुलाला मानेला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. चकमक सुरू असताना निदर्शने करत असलेल्या नागरिकांमध्ये नाझरी होता आणि जवानांनी निदर्शकांवरही गोळीबार केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा दावा आहे. लष्कराने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. चकमकीदरम्यान आणखी एक युवकही जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Web Title: Two terrorists killed in Pulwama encounter