नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या सत्कारावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र आक्षेप घेतला आहे. शरद पवार यांनी शिंदे यांचा नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या आणि राज्यातील उद्योग पळवून नेणाऱ्या अमित शहा यांचा सत्कार केला असे आपण मानतो,’ अशी टीका पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी केली.
पवार यांनी मंगळवारी (ता.११) सायंकाळी शरद एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. यावर ‘राजकीय नेत्यांना दिले जाणारे असे पुरस्कार खरेदी केले जातात किंवा विकले जातात,’ अशी टीका राऊत यांनी केली. ‘शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू वा मित्र नसतो.
पण ज्यांनी अमित शह यांच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर केला, अशांना सन्मानित केल्यावर राज्यातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? त्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जायला नको होते ही आमची भावना आहे,’ असे राऊत म्हणाले. राजकारण आम्हालाही कळते. राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार यांचे कुटुंब फोडले याचे भान राखून आम्ही आमची पावले टाकत असतो, अशी टिपणी त्यांनी केली.
म्हणून शिंदे यांना सन्मान
‘एकनाथ शिंदे हे महादजी शिंदे यांच्या साताऱ्यातून आले आहेत. त्यांनी काश्मीर आणि पंजाबमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला,’ असे दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही साहित्य संमेलनांवर गंभीर स्वरूपाची टीका झाली आहे. महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी असे वादविवाद चांगले आहेत. राऊत आमचे चांगले मित्र आहेत, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपायची असतात. आज जे दोष देत आहेत,त्या सर्वांना जनता धडा शिकवेल, हा शरद पवार आणि साहित्यिकांचा अपमान आहे.’ भाजपनेही जोरदार टीका केली असून पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे नतद्रष्टपणा आहे, अशा शब्दांत राऊत यांचा समाचार घेतला.
साहित्य संमेलनाला भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसा
‘‘दिल्लीतील आगामी मराठी साहित्य संमेलन हे संमेलन नसून राजकीय दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसा गोळा करून होणारे संमेलन आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्याविषयी आपण त्यांना पत्र लिहिणार आहो. साहित्याशी या संमेलनाचा काहीही संबंध नाही,’ असा आरोप राऊत यांनी केला.
शरद पवार यांच्या भेटीला सामंत, म्हस्के
शिवसेनेचे उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शरद पवार यांच्या हस्ते काल झालेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार तसेच या सत्कारावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला होती, अशी चर्चा होती.
शरद पवार हे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्यामुळे तसेच आपण दिल्लीत आल्यामुळे ही सदिच्छा भेट घेत असल्याचे उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामंत दिल्लीत आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.