"योगींच्या दौऱ्याने उद्धव ठाकरेंची झोप उडालीय, भाषेचा गैरवापर ही शिवसेनेची संस्कृती"

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारी मालिका मिर्झापूर आणि उत्तर प्रदेशातील स्थिती सारखीच असल्याची टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसासाठी मुंबई दौऱ्यावर होते. मुंबईमधील बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्याविषयीच्या हालचाली त्यांनी या दोन दिवसीय दौऱ्यात केल्या. त्यांच्या या दौऱ्यावरुन अनेक शाब्दिक चकमकी घडत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही या विषयाचा समाचार घेण्यात आला आहे. यावर आता उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी टीका केलीय.

हेही वाचा - योगींजींच्या हालचालींमागे महाराष्ट्र द्वेषाची किनार ?

त्यांनी म्हटलंय की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांची झोप उडाली आहे. त्यांनी सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये भाषेचा गैरवापर केला आहे, ज्याचा आम्ही निषेध नोंदवतो. ही त्यांच्या पक्षाची संस्कृती असू शकते. बॉलिवूडच्या लोकांकडून मोठ्या मनाने आमचं स्वागत केलं गेलं. शिवसेनेने दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये. त्यांनी सर्वांत आधी बॉलिवूडसोबतच आपल्या संस्कृतीलाही सुधरावं. जर त्यांना फिल्म सिटी आपल्याकडे ठेवायची असेल तर त्यांनी ती जरुर ठेवावी. कुणीही ती दूर करायला आलं नाहीये. ही एक स्पर्धा आहे.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेशातील गुंडगिरी, खिळखिळी यंत्रणा, बेरोजगारी आदींवर बोट ठेवण्यात आले आहे. यासोबतच योगी यांना भेटणारे अभिनेते अक्षय कुमार यांचाही शिवसेनेने समाचार घेतला आहे. संपूर्ण देश भीकेला लागलेला असताना, मुंबईतले ओरबाडून उत्तरेत सोन्याचा धूर काढणार का? असा संतप्त सवालही शिवसेनेने विचारला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारी मालिका मिर्झापूर आणि उत्तर प्रदेशातील स्थिती सारखीच असल्याची टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हेही वाचा - योगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटंलय की, मुंबईमधील फिल्म सिटी दुसरीकडे शिफ्ट करणं सोपं नाहीये. दक्षिण भारतातही फिल्म इंडस्ट्री मोठी आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्येही आहे. योगीजी याठिकाणीही जाणार आहेत का? तिथल्या दिग्दर्शक आणि कलाकारांशी बोलणार आहेत का? कि ते फक्त मुंबईतच हे करणार आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray has lost his sleep after Yogi Aditynaths visit to Mumbai UP Cabinet Minister S N Singh on Saamna Editorial