esakal | योगींजींच्या हालचालींमागे महाराष्ट्र द्वेषाची किनार ?
sakal

बोलून बातमी शोधा

up government

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत.

योगींजींच्या हालचालींमागे महाराष्ट्र द्वेषाची किनार ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. त्यातल्या त्यात दिवास्वप्न पाहण्यात तर मुळीच कसला उपद्रव नाही. पण योगीजी ही जी उठाठेव करत आहेत ती उत्तर प्रदेशच्या विकासासाठीची आहे की महाराष्ट्राचे पाय मागे खेचण्यासाठीची आहे? याचे परिशीलन एकदा व्हायला हवे. विकासाच्या बाबतीत तुलना करायची झाल्यास उत्तर प्रदेशसोबत महाराष्ट्राची स्पर्धा कधीच नव्हती. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत नावाप्रमाणेच 'महा' राहिलाय. पण योगींजींच्या या हालचालींमागे महाराष्ट्र द्वेषाची किनार असल्याची चर्चा होताना दिसतेय. 

हेही वाचा - योगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...

रोजगारनिर्मितीच्या प्रतिमेमागे महाराष्ट्रद्वेष?
याला एक पार्श्वभूमी म्हणजे अलिकडेच सुशांत सिंह राजपुतची आत्महत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. याला एक कारण म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अगदी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास शिवसेनेने हिरावून घेतला. याबाबतची पोटदुखी सातत्याने ठेवून अशी संधीच वारंवार शोधली जातेय ज्यात महाराष्ट्र सरकारची बदनामी करता येईल. मग ते पालघर मॉब लिंचींग प्रकरण असो वा सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण असो वा त्यानंतर कंगणा प्रकरणाचा थैयथैयाट असो... या साऱ्या प्रकरणात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्र हितापेक्षा नेहमीच पक्षहिताची भुमिका घेतलेली दिसून आली. बॉलिवूड उत्तर प्रदेशमध्ये उभं करण्याच्या कृतीमध्ये रोजगारनिर्मितीची प्रतिमा दिसते मात्र त्यामागे असाच महाराष्ट्रद्वेष असल्याचंही बोललं जातंय. 

उत्तर प्रदेशने आधी या मुद्यांवर द्यावं लक्ष
महाराष्ट्राची स्पर्धा उत्तर प्रदेशसोबत कधीच नव्हती. महाराष्ट्रातल्या बहुतांश मुख्य शहरात यूपीवाले भैये पाणीपुरी विकून रोजगारासाठी प्रयत्नशील असतात. महिला सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, साक्षरता दर, जीडीपी, इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, गव्हर्नन्स, उद्योगधंदे, पर्यावरण, पर्यटन अशा सर्व पातळ्यांवर महाराष्ट्र उत्तर प्रदेशच नव्हे तर इतर अनेक राज्यांच्याही पुढे आहेच. पण महाराष्ट्रासोबतच्या इर्षेतून बॉलिवूड उचलून नेण्याची उठाठेव योगींना सुचत असेल तर त्यांनी आधी मुख्यमंत्री म्हणून वरील पायाभूत मुद्यांवर लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. कारण या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवरील दुर्लक्ष उत्तर प्रदेशची ओळख गुंडाराज अशी करुन देतात. 

हेही वाचा - MDH चे आजोबा कालवश; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्राचा स्वभाव आणि इतरांचीही पोटदुखी
मराठी माणूस हा जोखिम घ्यायला घाबरतो, तो मराठीजणांचेच पाय खेचतो अशी टीका सातत्याने होते. अगदी मराठी पंतप्रधान न होण्यामागे हा स्वभाव आणि इतर राज्यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला मागे ठेवण्याचे राजकारण केल्याची चर्चा सातत्याने होते. अगदी मुंबई गुजरातला जाऊ म्हणून उभा राहिलेलं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, वा अलिकडेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन  प्रकल्प असो, या सगळ्यातून मुंबईचं वैभव महाराष्ट्रापासून हिरावून घ्यायच्या कारस्थानाची उघड चर्चा होताना दिसतेय. यातूनच शिवसेना आणि मनसे सारख्या मराठी अस्मितेच्या मुद्यांवर राजकारण करणाऱ्या पक्षांची स्थापना झाल्याचं पहायला मिळतंय. योगी आदित्यनाथांच्या या एकूण वर्तवणुकीचा समाचार यांनी घेतला आहेच. पण यादृष्टीने पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं निर्णायक ठरेल.


महाराष्ट्राचं 'महा'हृदय
योगीजींनी जर खुल्या दिलाने महाराष्ट्रातील मराठी माणसांकडे याबाबतची मदत मागितली असती तर महाराष्ट्र ती द्यायला नक्कीच तयार झाला असता इतपत मोठं हृदय महाराष्ट्राचं नक्कीच आहे. मात्र, मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी सोडाच तर इतर एकही मराठी उद्योगपतीशी, चित्रपट निर्मात्याशी वा इतर व्यक्तीशी न बोलता याप्रकारची स्वप्ने पाहणाऱ्या योगींनी एकदा विचार करायला हवा होता. इतकी वर्षे ज्या इंडस्ट्रीची पाळेमुळे मुंबईत घट्ट रोवली गेली आहेत, ती अशीच उखडून नेता येतील, असं त्यांना वाटत असेल तर तो एक भ्रमच ठरेल.

loading image