योगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...

yogi-adityanath
yogi-adityanath

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या पार्श्वभूमीवरही तीच कमाल दाखवेल...

प्रिय योगी जी,
मुंबईसारखी फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात उभी करण्यासाठी आपण आवर्जून महाराष्ट्रात आलात, याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. देश म्हणून भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहिला आहे आणि देशातील प्रत्येक राज्याला महाराष्ट्राने सातत्याने मदतीचा हात पुढे केला आहे, हा इतिहास आहे. त्यामुळं, तुमच्या राज्यात तुम्हाला मुंबईसारखी फिल्म इंडस्ट्री उभी करायची असेल, तर महाराष्ट्र तुमच्यासोबत काम करेलच, यात शंका नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुम्हाला माहिती असेलच, की केवळ मुंबईच्याच नव्हे; देशाच्या फिल्म इंडस्ट्रीचा पाया रचला तो राजा हरिश्चंद्र चित्रपटानं. हा चित्रपट निर्माण केला होता, दादासाहेब फाळकेंनी. फाळकेंना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणतात. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पित्याच्या राज्यानं उत्तर भारताच्या फिल्म इंडस्ट्रीच्या स्वप्नाला मदत नाही करायची; तर कुणी करायची?

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देशातल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण १९५४ मध्ये झालं. तुम्हाला माहिती असेलच, की साने गुरूजींच्या ‘श्‍यामची आई’ पुस्तकावर आधारीत ‘श्‍यामची आई’ या चित्रपटाला देशाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक होते प्रखर वक्ते, साहित्यिक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे. त्या आधी; म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य असताना विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल यांच्या ‘संत तुकाराम’ चित्रपटानं १९३७ च्या व्हेनिस महोत्सवात जगातल्या तीन उत्तम चित्रपटांमधला एक असा पुरस्कार पटकाविला होता.
बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम, फत्तेलाल, दामले अशा एकापेक्षा एक सरस व्यक्तिमत्त्वांनी आजची चित्रपटसृष्टी घडवली. ती देशासाठी घडवली. जगाच्या पाठीवर महाराष्ट्रानं भारताचं नेतृत्व केलं, हा गेल्या अवघ्या शंभर वर्षांचा चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगतो.

दादासाहेब तोरणे, व्ही शांताराम, दामले, फत्तेलाल, भालजी पेंढारकर अशा परंपरेवर भारताच्या चित्रपटसृष्टीचा पाया उभा आहे. याच गौरवाचा वारसा भानू अथैय्या (भानुमती राजोपाध्ये) यांच्यापासून ते अमोल पालेकर, आशुतोष गोवारीकर, संदीप सावंत, चैतन्य ताम्हाणे, अमित मसूरकर आदींच्या ऑस्करसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांपर्यंत आणि त्याअलिकडे-पलिकडेही पसरला आहे. नितीन देसाईंच्या जागतिक दर्जाच्या स्टुडिओपासून यशस्वी चित्रपट देणाऱ्या मधुर भांडारकरांपर्यंत आणि स्पेशल इफेक्टस् देणाऱ्या व्हीएफएक्स तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या इंजिनिअर्सपर्यंत सारे काही महाराष्ट्राकडं आज आहे.

शंभरावर वर्षांचा हा अत्यंत संक्षिप्त आढावा अशासाठी, की महाराष्ट्रानं, मुंबईनं भारतीय चित्रपटसृष्टी उभी केलीय आणि ती जगभरात अभिमानानं मिरवली जातेय. भारताच्या अन्य कुठल्याही भागात अशीच चित्रपटसृष्टी उभी करायची असेल, तर त्यासाठी लागणारं कौशल्य, बुद्धीमत्ता, जिद्द आणि मेहनतीची तयारी महाराष्ट्राकडं आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या पार्श्वभूमीवरही तीच कमाल दाखवेल, यात शंका नाही.

...फक्त त्यासाठी, योगी जी, तुम्हालाही फाळके-तोरणे-शांताराम यांच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा जपणाऱ्या आजच्या महाराष्ट्राचा हात हाती घ्यावा लागेल. निरंजन हिरानंदानी महाराष्ट्राचे आहेत आणि सुभाष घई, तरण आदर्शही; पण लता मंगेशकर, नाना पाटेकरांसारखे बुजूर्ग आणि रितेश देशमुख, नागराज मंजुळे, श्रेयस तळपदे, अजय-अतुल यांच्यासारखे तरूण चेहरेही महाराष्ट्राचेच आहेत आणि अशा महाराष्ट्राच्या भेटीविना तुमच्या दौरा ‘थोडा आधा; थोडा सा अधुरा’ राहून जाईल, याचीही नोंद असू द्या...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com