आसाराम बापूकडे 2300 कोटींची अघोषित मालमत्ता

पीटीआय
बुधवार, 22 जून 2016

नवी दिल्ली - स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल 2300 कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाने आसाराम आणि त्याच्या अनुयायांकडे असलेली अघोषित संपत्ती उघड केली आहे. स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड्स, किसान विकास पत्र आणि फिक्स डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणूक करुन आसाराम आणि अनुयायांनी हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. त्यापैकी बहुतांश गुंतवणूक आसारामने अधिग्रहण केलेल्या कोलकातामधील सात कंपन्यांमार्फत झाली आहे. त्याचे भक्त या कंपन्या चालवतात.

त्याशिवाय, आसारामने आपल्या अनुयायांमार्फत कर्ज वितरण व्यवसायदेखील सुरु केला होता. याअंतर्गत व्यक्ती व संस्थांना केवळ 1 ते 2 टक्के व्याजाने मोठ्या प्रमाणावर कर्जाऊ रोख रक्कम दिली जात. 1991-92 सालापासून आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त लोकांना 3,800 कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. त्यासाठी पोस्ट-डेटेड चेक, प्रॉमिसरी नोट्स आणि जमीनीची कागदपत्रे सुरक्षा म्हणून जमा करण्यात आली होती. आश्रमांना मिळालेल्या देणग्या लपविण्यासाठी असे करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. 

प्राप्तिकर विभागाच्या चौकशीविषयी बोलताना आश्रम प्रवक्त्या नीलम दुबे म्हणाल्या, हा बापूजींविरोधात कट आहे. त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाही. त्यांच्याकडे स्वतःची मोटारदेखील नाही. प्रत्येक गोष्ट ट्रस्टच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या नावावर आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आसाराम सध्या तुरुंगात आहेत.

Web Title: Undeclared assets of Asaram Bapu are worth 2300 Cr