बेळगावांत साकारला जाणारा भारतातला पहिला उपक्रम; शहरात बसणार Underground Dustbin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Underground Hydraulic Dustbin

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बेळगावांत साकारला जाणारा भारतातला पहिला उपक्रम

बेळगांव (कर्नाटक) : बेळगांव दक्षिणचे आमदार अभय पाटील (MLA Abhay Patil) यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या हेतूनं 'अंडरग्राऊंड हैड्राॅलिक डस्टबिन' (Underground Hydraulic Dustbin) हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमासाठी त्यांना दोन कोटींचा खर्च येणार आहे. तसेच हे हैड्राॅलिक डस्टबिन उचलण्यासाठी क्रेनचाही वापर होणार आहे. हा आगळावेगळा सेन्सर असलेला डस्टबिन बेळगावांत (Belgaum) येत्या पंधरा दिवसांत बसवण्यात येणार असून याची सुरुवात शहापुरातून होणार आहे. हा उपक्रम कर्नाटकातच (Karnataka) नाही, तर भारतातला पहिला उपक्रम असणार आहे.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्मार्ट बसथांबे, स्मार्ट पथदीप, दुभाजक आणि रस्त्याशेजारी फुटपाथ निर्माण करण्यात येत आहेत. तसेच आता अत्याधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंड्या बसविण्याचा निर्णय आमदार अभय पाटील यांनी घेतलाय. त्यामुळं बेळगावांत येत्या पंधरा दिवसांत 'अंडरग्राऊंड हैड्राॅलिक डस्टबिन' बसवण्यात येणार आहे. याकरिता दोन कोटींची निविदाही काढण्यात आलीय.

अंडरग्राऊंड डस्टबिनची एक टनाची क्षमता

शहरात पहिल्या टप्प्यात प्रत्येक वार्डात एक अंडरग्राऊंड डस्टबिन बसवलं जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात वार्डातील आणखी काही ठिकाणी डस्टबिन बसवण्यात येतील. या डस्टबिनची क्षमता एक टनाची असणार आहे. यासाठी काही नियमही असणार आहेत. या डस्टबिनमध्ये 75 टक्के कचरा साचल्यानंतर त्या प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्याला एक संदेश जाईल. तद्नंतर 90 टक्के कचरा साचल्यावर प्रभागातील नगरसेवकाला आणखी एक संदेश जाईल. त्यानंतर 100 टक्के डस्टबिन भरल्यावर प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यासह नगरसेवक व आयुक्तांना वाॅर्निंगचा मेसेज जाईल आणि कचरा का उचलला नाही, म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही होईल. या अशा उपक्रमामुळे शहरातील सफाई योग्यवेळी साफ होईलच, शिवाय शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासही मदत होणार आहे. तसेच हा उपक्रम आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असाच ठरणार आहे. हा आगळावेगळा सेन्सर असलेला डस्टबिन बेळगावांत येत्या पंधरा दिवसांत बसवण्यात येणार असून याची सुरुवात शहापुरातून होणार आहे. हा उपक्रम कर्नाटकातच नाही, तर भारतातला पहिला उपक्रम असणार आहे.

बेळगांव महानगरपालिकाही बसवणार भूमिगत कचराकुंड्या

बेळगांव महानगरपालिकेनंही (Belgaum Municipal Corporation) अत्याधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंड्या बसविण्याचा निर्णय घेतलाय. आणखी पंधरा ठिकाणी अत्याधुनिक कचराकुंड्या बसविण्यात येणार असून याकरिता 41 लाखाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक डस्टबिन आणि कॉम्पॅक्टर घेण्यात येणार आहे. याकरिता महानगरपालिकेनं निविदा मागविली असून जागा निश्चित करण्यात येणार आहे. स्मार्ट कचराकुंड्या फुटपाथ किंवा खुल्या जागेच्या ठिकाणी ठेवता येणं शक्य आहे. भूमिगत बसविण्यात येणाऱ्या एका कुंडीसाठी 3 लाख रुपये खर्च येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एका ठिकाणी भूमिगत कचराकुंडी बसविण्याचा प्रस्ताव आहे. सध्या एक कचराकुंडी आणि कॉम्पॅक्टरकरिता निविदा काढण्यात आलीय. ही अत्याधुनिक भूमिगत कचराकुंडी प्रायोगिक तत्त्वावर टिळकवाडी परिसरात बसविण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध भागात अशा 25 कचराकुंड्या महापालिका बसविणार असून यापैकी 15 कचराकुंड्यांकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. याकरिता 41 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

भटकी जनावरे, कुत्र्यांचा उपद्रव थांबणार

फुटपाथच्या ठिकाणी जमिनीच्या खाली टाकी बांधून, त्यामध्ये कचराकुंड्या ठेवण्यात येणार आहेत. त्यावर झाकण येणार असून, त्यावर केवळ कचरा टाकण्यासाठी लहान आकाराची पेटी असणार आहे. पाहणाऱ्यांना कचराकुंडी आहे, असे अजिबात वाटणार नाही. अशा पद्धतीची कचराकुंडी महापालिकाही बसविणार आहे. कचराकुंडी खुली असल्याने घाण व दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून नागरिक लांबूनच टाकून निघून जातात. कचराकुंडीत पडला की, बाजूला पडला याकडेदेखील लक्ष देत नाहीत. यावर उपाययोजना म्हणून या नव्या कुंड्या बसविण्याचा विचार चालविला आहे. कुंडी जमिनीखाली असल्याने वरच्या बाजूला केवळ कचरा टाकण्यासाठी झाकण असलेला डबा असतो. झाकण उघडून त्यामध्ये कचरा टाकल्यामुळे आजूबाजूला कचरा पसरत नाही. तसेच दुर्गंधी देखील पसरत नाही. कचराकुंडी भूमिगत असल्याने भटकी जनावरे किंवा कुत्र्यांचा देखील उपद्रव थांबणार आहे.

टॅग्स :Karnatakabelgaum