esakal | Budget 2021: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी गोंधळ; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खासदारांच्या घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

president in budget

या अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी विरोधकांनी बहिष्कार घातला.

Budget 2021: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी गोंधळ; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खासदारांच्या घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. मात्र, या अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी विरोधकांनी बहिष्कार घातला. केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांना असलेला आपला निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेससहित विरोधी पक्षांनी ही भुमिका घेतली. सकाळी 11 वाजता या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपतींनी भाषण केलं. मात्र, या भाषणावेळी संसदेत गोंधळ झालेला पहायला मिळाला. राष्ट्रपतींचं भाषण सुरु असतानाच काही खासदारांनी जोरजोरात घोषणा दिल्या.  राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी हाताता फलक आणि घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी कायदे असून ते रद्दबातल केले जावेत, अशी मागणी संसदेत करण्यात आली. 

देशातील 16 विरोधी पक्षांनी बहिष्कार घालत असल्याचं निवेदन प्रसिद्ध केलं होतं. याबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल गुरुवारी माहिती दिली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आययूएमएल, आरएसपी, एमडीएमके, केरळ कांग्रेस आणि एआययूडीएफ या पक्षांचा यात समावेश आहे.

हेही वाचा - दशकातलं पहिलं बजेट देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण; PM मोदी संसदेत दाखल

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी बहिष्कार टाकणे म्हणजे त्यांचा अपमान करणे, असा  होत नाही. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. हे कायदे रद्द केले जावेत, अशी आमची मागणी आहे. भाषणावर बहिष्कार टाकण्यामागे हेच कारण आहे. आम्ही चर्चेवेळी याबाबत आमची बाजू जरुर मांडू, असं काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं.

याबाबत बोलताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी म्हटलं की, कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. आम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी निषेध नोंदवला तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. आम्हाला सभागृहात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. मात्र आम्ही गेटवरुन घोषणा देत निषेध नोंदवला. शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. म्हणून आम्ही हे अभिभाषण बहिष्कृत केले. 

सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी भारताचा 2021 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडण्यास सुरुवात करतील.
 

loading image