esakal | देशातील शंभर सैनिक शाळा सोसायटीशी संलग्न; केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

army school

देशातील शंभर सैनिक शाळा सोसायटीशी संलग्न

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक शाळा सोसायटी अंतर्गत संलग्न सैनिक शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. यामध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या शंभर शाळांचा समावेश केला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रभावी नेतृत्व, राष्ट्रीय कर्तव्य आणि देशभक्तीची भावना विकसित करण्यासाठी मूल्याधारित शिक्षणावर अधिक लक्ष पुरवण्याच्या अनुषंगाने हा पाऊल उचलण्यात आला आहे.

हेही वाचा: महानवमीला घेतला तरुणाचा बळी; मनोरुग्णाच्या कृत्यानं हादरलं गाव

सैनिक शाळांद्वारे उत्तम दर्जाचे, मूल्याधारित शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर सैनिकी नेतृत्व, प्रशासकीय सेवा, न्यायिक सेवा आणि विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता सारख्या विविध क्षेत्रात सर्वसामान्य पार्श्वभूमी पासून सर्वोच्च स्तरापर्यंत सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांचा इतिहास आहे. त्यामुळे सैनिक शाळांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. त्यासाठी १०० नव्या संलग्न सैनिक शाळा उभारण्यासाठी सरकारी, खासगी शाळा, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून, सैनिक शाळा सोसायटीच्या सध्याच्या शाळा किंवा नव्या शाळांसाठी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळा विशिष्ट स्तंभ म्हणून काम करणार असून संरक्षण मंत्रालयाच्या सध्याच्या सैनिक शाळांपेक्षा यांचे स्वरूप वेगळे राहणार आहे.

सध्या देशातील ३३ सैनिकी शाळांमध्ये सहाव्या इयत्तेत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे. मात्र नव्या शाळांमध्ये २०२१-२३ या शैक्षणिक वर्षापासून पाच हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यामुळे खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नव्या क्षमतांचा विकास होईल. तसेच सैनिकी शाळांच्या वातावरणामध्ये शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळेल.

हेही वाचा: कर्नाटकच्या राजकारणात भूकंप; काँग्रेस-जेडीएस युती संपुष्टात

फायदे :

  • देशातील सर्व प्रांतातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठीचा पर्याय

  • सैनिक शाळांसाठीची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबर प्रभावी शारीरिक, मानसिक-सामाजिक, आध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक विकास प्रदान करणे

  • युवकांची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच, प्रशिक्षण कालावधी, प्रशिक्षक, देखभाल, यांच्यात बचत

इच्छुक शाळांना https://sainikschool.ncog.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रस्ताव सादर करता येतील. तर संकेतस्थळावर योजनेची वैशिष्ट्ये, पात्रतेचे निकष, संरक्षण मंत्रालय आणि शालेय व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे.

loading image
go to top