कोरोनाविरोधातील लढाईसाठी पुढील अडीच महिने महत्त्वाचे, आरोग्य मंत्र्यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

कोरोनामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. परंतु, काही साध्या उपायांमुळे या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात रोखता येतो.

नवी दिल्ली- कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी पुढील दोन ते तीन महिने भारतासाठी खूप महत्त्वाचे असल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिला आहे. हिवाळा आणि सणासुदीचा हंगाम असल्यामुळे पुढील अडीच महिने कोरोनाविरोधातील युद्धासाठी महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले. भारतात कोविड-19 च्या तीन लशी विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातील एक लस ही क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे तर उर्वरित दोन दुसऱ्या टप्प्यात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 

लवकरच कोरोना विषाणूवरील लशीचे भारतात उत्पादन सुरु होईल, असा विश्वास हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. पुढील अडीच महिने कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण हिवाळा आणि सणासुदीचा हंगाम येत आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकाने याचा संसर्ग वाढू नये यासाठी जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, कोणीही बेसावध राहू नये, असा सल्ला त्यांनी दिला. 

हेही वाचा- 'नितीश कुमार थकल्याने राज्य चालविणे कठीण’

कोरोनामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. परंतु, काही साध्या उपायांमुळे या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात रोखता येतो. मास्क घालणे, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर राखले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला. 

हेही वाचा- Bihar Election 2020 : पासवान यांचे गाव अंधारातच!

कोरोनातून बरे होणाऱ्याचे जगात सर्वाधिक प्रमाण भारतात असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. त्याचबरोबर यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही कमी असल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, कोविड विषाणूवर प्रभावी ठरणारी लस 2021 च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता असल्याचे काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन यांनी म्हटले होते. तसेच, लस एकापेक्षा अधिक स्त्रोतांपासून मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले होते. 

हेही वाचा- ‘पीटीआय’ची रसद अखेर थांबवली; चिनी राजदूताची मुलाखत प्रसिद्ध करणे नडले?

पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला लस मिळण्याची शक्यता आहे. शिवाय आपल्या देशाला एक किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रोतांपासून कोरोनावरील लस मिळू शकते. कोरोनावरील लस कोणाकडून सर्वात आधी मिळू शकेल, याबाबत आपला तज्ज्ञ गट माहिती घेत आहे. त्या दिशेने प्रयत्न केले जात असून कोल्ड चेन सुविधाही मजबूत केली जात आहे, असं हर्षवर्धन म्हणाले आहेत. यापूर्वी आरोग्य मंत्र्यांनी कोरोनावरील लस 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यात उपलब्ध होईल, असे म्हटलं होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Health Minister Harsh Vardhan Says Next Two And A Half Months Are Very Important In The Fight Against Coronavirus