
टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाल्याने त्यांचा मान वाढला नाही, तर यामुळे नोबेल पुरस्काराचाच मान वाढला. विश्वभारती विद्यापीठाला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
शांतिनिकेतन - पश्चिम बंगालच्या दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वभारती विद्यापीठाला भेट देत गुरुदेव रवींद्रनाथ टोगोर यांना आदरांजली वाहिली. टागोरांनी शांतिनिकेतनला सांस्कृतिक केंद्र बनविले, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विश्वभारती विद्यापीठाच्या परिसरात अमित शहा सुमारे दोन तास होते. यावेळी पत्रकारांसमोर बोलताना ते म्हणाले की,‘‘गुरुदेव टागोरांनी केवळ भारतीय तत्वज्ञान आणि साहित्यातच भर घातली नाही तर, भारतीय संस्कृतीला इतर देशांच्या संस्कृतींशी जोडण्याचे केंद्र म्हणून शांतिनिकेतनचा विकास केला. मनाचा संकुचितपणा दूर होऊन सत्याचे ज्ञान होणे, हा शिक्षणाचा खरा उद्देश असल्याचे गुरुदेवांनी आपल्याला सांगितले. टागोरांचे स्वातंत्र्य चळवळीतही मोठे योगदान होते. आपल्या देशात दोन प्रकारचे राष्ट्रवाद होते आणि महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे अर्ध्वयू होते. विशेष म्हणजे, दोघांना टागोरांपासूनच स्फुर्ती मिळाली होती. टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाल्याने त्यांचा मान वाढला नाही, तर यामुळे नोबेल पुरस्काराचाच मान वाढला.’’ विश्वभारती विद्यापीठाला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने टागोरांची शिकवण जगभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याद्वारे भारतीय ज्ञान आणि संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेल, असेही शहा यावेळी म्हणाले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा