esakal | केंद्रीय मंत्री पासवान यांची प्रकृती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

ram vilas paswan

पासवान यांना आधीपासून हृदयविकार असल्याने त्यांचे हृदय कमजोर झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही शक्य नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

केंद्रीय मंत्री पासवान यांची प्रकृती चिंताजनक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती ढासळली असून चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर फोर्टिस एर्स्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पासवान यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला असून मूत्रपिंडही निकामी झाले आहे. पासवान यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. पासवान यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पासवान यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पासवान यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास आहे. 2017 मध्ये त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. लंडनमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयातील सदोष व्हॉल्व हा दुसरे उपकरण बसवून दुरुस्त करण्यात आला होता. याशिवाय अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
 

पासवान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, पासवान यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. पासवान यांना आधीपासून हृदयविकार असल्याने त्यांचे हृदय कमजोर झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही शक्य नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हे वाचा - रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता; विमानतळाच्या धर्तीवर अतिरिक्त शुल्क आकारणी?

केंद्रात मंत्री असलेल्या पासवान यांच्याकडे धान्य पुरवठा आणि ग्राहक तक्रार निवारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. पासवान यांचा बिहारमधील लोक जनशक्ती पक्ष हा राज्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे संयुक्त जनता दल आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पासवान यांनी गेल्या 32 वर्षांत 11 वेळा निवडणूक लढवली आहे. यात ते 7 वेळा जिंकले आहेत. तसंच त्यांनी केंद्रात सातवेळा मंत्री म्हणून काम केले आहे. बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे अनेकवेळा प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. 

बिहारमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा जेडीयू, भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तसंच राज्यातील पक्षाची धुरा पासवान यांचे पुत्र चिराग पासवान सांभाळत आहेत. मागील काही काळापासून चिराग पासवान आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करीत असल्यानं राज्यातील सत्ताधारी आघाडीत बिनसल्याची चर्चा सुरु आहे.