पीडित तरुणीला ‘एम्स’मध्ये हलविले

पीटीआय
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला आज एअर ॲब्म्युलन्सद्वारे नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लखनौ - उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला आज एअर ॲब्म्युलन्सद्वारे नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर झाल्याने हा निर्णय करण्यात आला. तिच्या वकिलाची प्रकृती गंभीर आणि स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांकडून आज देण्यात आली. दोघेही अद्याप शुद्धीवर आलेले नसून, ‘डीप कोमा’मध्ये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

अपघातात गंभीर जखमी झालेली पीडित तरुणी आणि तिच्या वकिलावर लखनौमधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘पीडित तरुणी अद्यापही बेशुद्ध (डीप कोमा) असून, तिची प्रकृती काही प्रमाणात सुधारत आहे. ती सूचनांना प्रतिसाद देत असून, डोळ्यांची हालचाल करू लागली आहे. कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणा काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचार सुरू आहेत,’ असे रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

पीडित तरुणीच्या वकिलाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली नाही, ते अद्यापही बेशुद्ध (डीप कोमा) आहेत. कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणा काढण्यात आली असून, ते नैसर्गिकरीत्या श्वास घेऊ लागले आहेत, असे रुग्णालयाने म्हटले आहे. 

पीडित तरुणी प्रवास करत असलेल्या मोटारीला २८ जुलै रोजी अपघात झाला होता, त्यात तिचे दोन नातेवाई ठार झाले, तर पीडिता आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सेंगरसह दहा जणांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

‘पीडितेला हवाईमार्गे दिल्लीला हलवा’
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला अधिक चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. हवाईमार्गे पीडितेला लखनौमधून दिल्लीला आणण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यानुसार संबंधित पीडितेला ‘एम्स’मध्ये हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnao rape case victim was moved to AIIMS