भाजप आमदारावर रेपचा आरोप करणारी तरुणी अपघातात जखमी; घातपाताचा संशय

वृत्तसंस्था
रविवार, 28 जुलै 2019

- रायबरेली तुरुंगात असलेल्या आपल्या काकांना भेटून परत येत असताना हा अपघात झाला.

रायबरेली : भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी उन्नाव येथील पीडित तरुणी आज मोटार अपघातात गंभीर जखमी झाली. या अपघातात त्या तरुणीची काकू, वकील महेंद्र सिंह आणि गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून हा घातपात असण्याची दाट शक्यता आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

रायबरेली तुरुंगात असलेल्या आपल्या काकांना भेटून परत येत असताना हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. त्या वेळी समोरून आलेल्या ट्रकशी त्यांच्या मोटारीशी टक्कर झाली. यात मोटारीचे तुकडे तुकडे झाले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. 

या तरुणीने गेल्या वर्षी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून न्यायाची मागणी केली होती. त्या वेळी हे प्रकरण उघडकीस आले होते.

काय आहे हे प्रकरण?  
नोकरी मिळविण्यासाठी भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्याकडे ती 2017 मध्ये गेली होती. त्या वेळी आमदार सेंगर आणि त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. न्याय मिळावा यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. तसेच आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. मात्र. सुरक्षारक्षकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.

या प्रकरणी पीडितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. विशेष म्हणजे या तरुणीचे वडीलच तिचा खटला न्यायालयात लढत होते. मात्र, त्यांना पोलिस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnao Woman Who Accused BJP MLA of Rape Injured in Road Accident three Killed