esakal | दिल्लीत ‘टू प्लस टू’ चर्चा; अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री भारतात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

america india

‘टू प्लस टू’ चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर आज दिल्लीत दाखल झाले. मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांची चर्चा होईल.

दिल्लीत ‘टू प्लस टू’ चर्चा; अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री भारतात दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत आणि अमेरिकेदरम्यान मंत्रिस्तरीय टू प्लस टू चर्चा दिल्लीत होणार आहे. तंत्रज्ञान आणि सामरिक भागीदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या चर्चेदरम्यान चिनी विस्तारवादाला पायबंद घालणाऱ्या रणनितीवरही विचारमंथन अपेक्षित आहे. त्यापार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताची प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर वेगाने पुढे येणारी शक्ती अशा शब्दात भारताच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

‘टू प्लस टू’ चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर आज दिल्लीत दाखल झाले. मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांची चर्चा होईल. दोन्ही देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीमध्ये व्यापक सामरिक भागीदारीला चालना देण्याबरोबरच संरक्षण साहित्य विषयक करारमदार, व्यापारी करारांवरही शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. यामध्ये संयुक्त युद्भाभ्यास, गोपनीय माहितीची देवाणघेवाण, तसेच बीईसीए (बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन अॅग्रिमेन्ट) हे करारही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. अचूक मारा करणारे ‘एमक्यू ९ बी’ हे ड्रोन भारताला ‘बीईसीए’ करारामुळे मिळू शकेल.

हे वाचा - तैवानमुळे वाढली चीनची पोटदुखी

समान मूल्य आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्रासाठीची कटिबद्धता हा द्विपक्षीय संबंधांचा आधार असून जगातील सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी लोकशाही या नात्याने अमेरिका आणि भारताने व्यापक लोकशाही परंपरांचा लाभ घेतला असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान ‘टू प्लस टू’ चर्चेची ही तिसरी फेरी आहे. यापूर्वी २०१८ मध्ये दिल्ली आणि २०१९ मध्ये वॉशिंग्टन येथे ही चर्चा झाली होती.

राजनाथ- एस्पर वाटाघाटी
संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्यात आज संरक्षण विषय मुद्द्यांवर वाटाघाटी झाल्या. संरक्षण सहकार्य आणखी व्यापक करणारी ही चर्चा असल्याचे राजनाथसिंह यांनी बैठकीनंतर ट्विटद्वारे सांगितले. यावेळी सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदोरिया आणि नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह हे देखील उपस्थित होते.