अर्थसंकल्पामधून प्रत्येकाची स्वप्नपूर्ती: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

शिक्षणापासून ते व्यवसायापर्यंत, कापड उत्पादनापासून ते करबचतीपर्यंत; या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून देशातील प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "उत्तम अर्थसंकल्प' मांडल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. पंतप्रधानांनी यावेळी डिजिटल माध्यमांमधून आर्थिक व्यवहारांची असलेली आवश्‍यकता अधोरेखित करत सरकार हे देशातील गरीबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे ठाम प्रतिपदन केले.

पंतप्रधान म्हणाले -

  • या अर्थसंकल्पामधून भ्रष्टाचार व काळे धन नष्ट करण्यासंदर्भातील सरकारची कटिबद्धता ध्वनित झाली आहे.
  • देशातील गावे, शेतकरी आणि गरीबांचे कल्याण हा अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
  • "रेल्वे संरक्षण निधी'वर यावेळच्या रेल्वे अर्थसंकल्पाचा भर. रेल्वे अर्थसंकल्पाच्या या अर्थसंकल्पामधील विलीनीकरणामधून वाहतूक क्षेत्राच्या विकासास मोठी चालना मिळेल
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचे ध्येय. याचबरोबर, या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
  • डिजिटल माध्यमामधून आर्थिक व्यवहार करण्यावर देण्यात आलेला भर हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य
  • शिक्षणापासून ते व्यवसायापर्यंत, कापड उत्पादनापासून ते करबचतीपर्यंत; या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून देशातील प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत
  • अरुण जेटली यांनी "उत्तम अर्थसंकल्प' मांडला आहे. देशातील गरीबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा अर्थसंकल्प समर्पित आहे.
  • या अर्थसंकल्पामधून देशामधील गृहनिर्माण क्षेत्रासही मोठा फायदा होईल

अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा पहिला अर्थसंकल्प विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) अखेर संसदेत सादर केला. वैयक्तिक प्राप्तिकरदात्याला सवलत, राजकीय पक्षांच्या निनावी देणग्यांवर अंकुश, संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद आणि नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन जेटली यांनी अर्थसंकल्पात केले. 

यंदा पारंपरिक प्रथांना छेद देत केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प रद्द करीत केंद्रीय अर्थसंकल्प तब्बल एक महिना अगोदर सादर करण्याचा निर्णय घेतल्याने हा अर्थसंकल्प अधिक लक्षवेधी ठरला आहे. रेल्वेसाठी १.३१ हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प जेटली यांनी मांडला. 

वसंत पंचमीच्या मुहुर्तावर सादर केला जाणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकरी, ग्रामीण लोकसंख्या, युवक, गरीब, पायाभूत सुविधा, आर्थिक क्षेत्र, कालबद्ध उत्तरदायित्व, सार्वजनिक सेवा, खर्चावर नियंत्रण आणि सुटसुटीत करणप्रणाली या दहा मुद्द्यांवर सरकारचा भर असेल, असे जेटली यांनी स्पष्ट केले

Web Title: "Uttam Budget', Modi applauds budget