मोफत धान्य, मेट्रो आणि बरंच काही - अखिलेश

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू. कमी वयात मला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. समाजवादी पक्षावर नागरिकांचा विश्वास आहे. तीन वर्षांपूर्वी अच्छे दिन, सबका साथ सबका विकासची घोषणा देण्यात आली होती. आता त्यांच्याकडे नागरिकांना सांगायला काहीच राहिले नाही.

लखनौ - समाजवादी पक्षाचे (सप) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज (रविवार) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना, आग्रा, कानपूर, वाराणसी आणि मेरठमध्ये मेट्रो सुरु करणार असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला मुलायमसिंह यादव व शिवपाल यादव अनुपस्थित होते.

उत्तर प्रदेशात आठ टप्प्यांत मतदान होणार असून, त्यानिमित्त आज समाजवादी पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात मेट्रो, रस्ते, माध्यान्ह भोजन, गरिब कुटुंबीयांना मोफत गहू तांदुळ अशा अनेक घोषणा केल्या. लहान मुलांना दर महिना एक किलो तूप आणि दूध पावडर देण्याचीही घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली. या कार्यक्रमाल मुलायमसिंह यांची खुर्ची मोकळी होती. तर, अखिलेश यांची पत्नी डिंपल यादव व आझम खान उपस्थित होते.

अखिलेश यादव म्हणाले, की आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू. कमी वयात मला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. समाजवादी पक्षावर नागरिकांचा विश्वास आहे. तीन वर्षांपूर्वी अच्छे दिन, सबका साथ सबका विकासची घोषणा देण्यात आली होती. आता त्यांच्याकडे नागरिकांना सांगायला काहीच राहिले नाही. देशातील नागरिक विचारत आहेत, कुठे आहेत अच्छे दिन. विकासाच्या नावावर देशातील नागरिकांच्या हातात झाडू दिला, तसेच त्यांना योगा करायला सांगण्यात आले. 

जाहीरनाम्यातील प्रमुख बाबी - 

 • प्रत्येक गावापर्यंत डॉक्टर असलेली रुग्णवाहिका पोचविणार
 • सर्व जिल्हा मुख्यालये दूरध्वनीच्या माध्यमातून जोडणार
 • पूर्वांचलमध्ये स्टार्ट योजना सुरु करणार
 • गरिबांना मोफत गहू आणि तांदूळ देणार
 • माफक दरात कामगारांना माध्यान्ह भोजन उपलब्ध करणार
 • गरिब महिलांना प्रेशर कुकरचे वाटप करणार
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी ओल्ड एज होम सुरु करणार
 • एक कोटी नागरिकांना दर महिना 1 हजार रुपये पेन्शन देणार
 • थेट बँक खात्यात जमा होणार समाजवादी पेन्शन
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपबरोबर स्मार्ट फोन देणार
 • मुलांना एक किलो तूप, दूध पावडर देणार
 • अल्पसंख्यांकांसाठी कौशल्य विकास योजना सुरु करणार
 • शहराप्रमाणे गावांतही 24 तास वीजपुरवठा करणार
Web Title: Uttar Pradesh assembly polls: Akhilesh Yadav releases SP manifesto