भाजप घेणार महिला मेळावे | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर प्रदेश निवडणुक; भाजप घेणार महिला मेळावे

उत्तर प्रदेश निवडणुक; भाजप घेणार महिला मेळावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सत्ता राखण्यासाठी महिला केंद्रस्थानी ठेवून सूत्रबद्ध मोहिमा राबविण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांची सुरक्षा, महिला सबलीकरणाचे विविध उपक्रम रविवारपासून (ता. १४) राबविले जातील.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीत कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्याचा प्रचार भाजपकडून ठामपणे केला जात आहे. भाजपच्या महिला मोर्चाकडून नऊ शहरांत मेळावे आयोजित केले जातील. रविवारी झाशीत प्रारंभ झाल्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम चालेल. यास कमल शक्ती संवाद असे नाव देण्यात आले आहे. मेळाव्यास दोन हजार महिला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. २०१७ मध्ये राज्यात भाजप सत्तेवर आल्यापासून महिलांचे जीवन कसे बदलले आणि त्यांच्या सुरक्षेची स्थिती याविषयी त्यात चर्चा होईल.

हेही वाचा: दिल्लीत जानेवारीत सायबर हिंसेवरील परिषद

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाती श्रीनिवासन यांनी सांगितले की, महिला सुरक्षेवर आमचा भर असेल. राज्यात रोमिओविरोधी पथके तयार करण्यात आली आहेत. केंद्राने महिलांसाठी अनेक योजना आखल्या आहेत. लष्करात महिलांना पदे दिली जात आहेत. पोलिस दलातील महिलांचा सहभाग वाढावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महिलांचे सबलीकरण होत आहे. सरकारी योजनांमुळे आपल्या जीवनात बदल झाल्याची अनेक महिलांची भावना आहे.

विरोधी पक्षांना शह

उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर वेळोवेळी टीका केली आहे. निवडणूक जवळ येत असताना याचे प्रमाण वाढले आहे. प्रियांका यांनी विद्यार्थिनींसाठी स्मार्टफोन आणि स्कुटी मोफत देण्याच्या घोषणेनंतर आशासेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मानधन देऊ असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महिला मेळाव्यांचा योजनाबद्ध उपक्रम आखत विरोधी पक्षांच्या आश्वासनांमधील हवा निवडणुकीपूर्वीच काढून घेण्याची खेळी केली आहे.

loading image
go to top