उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये मतदानाला सुरवात

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

उत्तर प्रदेशात 49 मतदारसंघांत आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील आणि मणिपूरमध्ये आज (शनिवार) सकाळी मतदानाला सुरवात झाली. 

उत्तर प्रदेशात 49 मतदारसंघांत आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या टप्प्यात मुलायमसिंह यादव यांच्या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, भाजप नेते योगी आदित्यनाथ व गॅंगस्टर मुख्तार अन्सारी, स्वामी प्रसाद मौर्य व इतर दिग्गज नेते रिंगणात असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1.72 कोटी मतदार विविध पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य निश्‍चित करतील. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या, या अखेरच्या दोन टप्प्यांत भाजपने ध्रुवीकरणावर जोर दिला आहे. सहाव्या टप्प्यातील ४९ मतदारसंघांत समाजवादी पक्षाचे बलस्थान असलेल्या सुमारे ३० हिंदूबहुल मतदारसंघांवर 'विशेष लक्ष' केंद्रित करण्याच्याही सूचना भाजप नेत्यांना दिल्या गेल्या आहेत. या टप्प्यात भाजप आमदारांची संख्या तीनवरून ३० पर्यंत नेण्याचा पक्षनेतृत्वाचा निर्धार आहे.

मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान 
इम्फाळ - विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या 38 मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. मतदानासाठी 1643 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, या टप्प्यात 168 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राज्यात सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रचारात प्रमुख मुद्दा बनली होती. याशिवाय पायाभूत सुविधा, विकासावरून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. आयर्न लेडी इरोम शर्मिला यांच्या नेतृत्वाखालील प्रजा पक्ष या निवडणुकीला प्रथमच सामोरा जात असल्याने याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Uttar Pradesh, Manipur assembly election 2017 polling