उत्तराखंडमध्ये भाजपचे तीन तिघाडा-काम बिघाडा | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics
उत्तराखंडमध्ये भाजपचे तीन तिघाडा-काम बिघाडा

उत्तराखंडमध्ये भाजपचे तीन तिघाडा-काम बिघाडा

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये काँग्रेस "तीन तिघाडा-काम बिघाडा" या प्रचारगीताने सत्ताधारी भाजपला (BJP) घेरणार आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (Congress) आज या प्रचारगीताचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, यावर मात्र पक्षाचे नेते मौन बाळगून आहेत.

२४ अकबर मार्ग येथील मुख्यालयात झालेल्या विशेष पत्रकार परिषदेत उत्तराखंडच्या प्रचार समितीचे प्रमुख हरिश रावत, प्रदेशाध्यक्ष गणेश गोदीयाल, विधिमंडळ पक्षनेते प्रीतम सिंह, अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे उत्तराखंडचे प्रभारी देवेंद्र यादव आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत या प्रचारगीताचे प्रकाशन झाले.

या प्रचारगीतामध्ये सत्ता परिवर्तनाचे आवाहन करतानाच पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलल्यावरून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. त्याचा संदर्भ देत रावत यांनी भाजपने एकापाठोपाठ एक मुख्यमंत्री बदलून उत्तराखंडच्या जनतेचा अपमान केला आहे, असा आरोप केला. पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री आणावे लागणे हे भाजपचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे डबल इंजिन मॉडेल अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली.

भाजपने एका मुख्यमंत्र्याला विधानसभा अधिवेशनात घटनात्मक जबाबदारी पार पाडण्याआधीच हटविले. तर दुसरे कधी सधवा झाले आणि कधी विधवा झाले हे त्यांनाच कळाले नाही, असा टोलाही रावत यांनी पदच्युत झालेले मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि तिरथसिंह रावत यांचे नाव न घेता लगावला. तसेच, भाजप नेतृत्वाला असलेल्या काँग्रेसच्या भीतीमुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांचे पद टिकल्याची कोपरखळीही हरीश रावत यांनी मारली.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या रावत यांनी पत्रकार परिषदेत या दावेदारीबाबत सोईस्कर मौन पाळले. याबाबत छेडले असता रावत यांनी "जनता हाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा" अशी टिप्पणी केली.

पंजाबचा फॉर्म्युला कायम

उत्तराखंडमध्ये पक्षांतर्गत कलह वाढू नये यासाठी ‘एका घरातून एकापेक्षा अधिक उमेदवार नको‘ या फॉर्म्युल्यावर काँग्रेस नेतृत्व गंभीर असल्याचे समजते. पंजाबमध्ये या निर्णयाची घोषणा झाली असली तरी उत्तराखंडबाबत पक्ष सावध आहे. राज्याचे प्रभारी देवेंद्र यादव यांनी उत्तराखंडमधील उमेदवारीबाबत लवकरच घोषणा केली जाईल असे यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

उत्तराखंडमध्येही भाजपचा प्रकल्पांच्या घोषणांचा धडाका

डेहराडून : पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असलेल्या उत्तराखंडमध्येही भाजपने प्रकल्पांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी विकासनगर या मतदारसंघासाठी २६० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा कोनशिला समारंभ धडाक्यात केला.

केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांच्या मुख्य उपस्थितीत धामी यांनी विजय संकल्प यात्रा काढली. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत केंद्राने उत्तराखंडसाठी एक लाख कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प मंजूर केले असून ते पूर्णत्वास नेण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. मी राज्याचा मुख्य सेवक बनल्यापासून सरकारने याबाबतचे सर्व आदेश जारी केले आहेत. आधीच्या सरकारच्या तुलनेत याच बाबतीत आम्ही वेगळे ठरलो आहोत. आम्ही करतो त्या घोषणांची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रयत्नशील राहतो.

रौप्य महोत्सवाचे लक्ष्य

उत्तराखंड राज्याच्या स्थापनेचा रौप्य महोत्सव तीन वर्षांनी येणार आहे. तेव्हा देशात हे राज्य आघाडीवर असावे म्हणून सर्व खात्यांनी विकासाचा पथदर्शी प्रकल्प तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री धामी यांनी दिल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UttarakhandChief Minister
loading image
go to top