
Uttarakhand floods trap 10 tourists from Nanded: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. केवळ सर्वसमान्य नागरिकांनाच नाहीतर बचावकार्यासाठी आलेल्या लष्करी जवानांनाही याचा फटका बसला आहे. सध्या प्राप्त माहितीनुसार जवळपास ५० पेक्षाअधिक नागरिकासंह लष्कराचे आठ ते दहा जवान बेपत्ता झाले आहेत. दरम्यान या महासंकटात महाराष्ट्रामधीलही काहीजण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेड येथील दहा पर्यटक उत्तराखंडमधील संकटात अडकले आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी एखाद्या सुखरूप ठिकाणी पोहोचता यावे म्हणून या पर्यटकांना जवळपास २५ किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे.
तर या दहा पर्यटकांपैकी सात जण एका ठिकाणी तर उर्वरीत तीन पर्यटक अन्य एका ठिकाणी अडकलेले आहेत. नांदेडमधील बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे आणि सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली आहे.
नांदेडहून आलेलो आम्ही काहीजण घटनास्थळाजवळ आहोत. येथे तुफान पाऊस सुरू असून, सगळ्याच रस्त्यांना पूर आलाय, त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत. आमच्या ग्रुपमधील सातजण दुसऱ्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही तीनजण एका ठिकाणी आहोत. तर कृपया कोणी जर येण्याचा विचार करत असेल, तर सध्या येणे टाळावे. हेच आमचं सांगणं आहे, धन्यवाद. असं उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने व्हिडिओद्वारे सांगतिलं आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण ढगफुटी झाली. या ढगफुटीचा सर्वाधिक फटका धराली गावाला बसला आहे. यावेळी आलेल्या मुसळधार पावसामुळे या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत, याशिवाय लष्कराचे १० जवानही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
या पुरामुळे गंगोत्री धामकडे जाणाऱ्या रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी धराली गावा जवळपास २०० हून अधिक पर्यटक असल्याची माहिती आहे. पूर आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय लष्कराच्या तुकड्यांकडून बचावकार्य सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.