
उत्तराखंडमध्ये गंगोत्रीच्या मार्गावर असणाऱ्या धराली गावाजवळ ढगफुटीमुळे हाहाकार उडाला आहे. मंगळवारी या परिसरात पूरसदृश्य स्थितीनंतर डोंगरावरून प्रचंड प्रमाणात मातीचा मलबा खाली आला. वेगात घरांवर आणि इमारतीवर हा मातीचा मलबा आदळून अनेक जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर भारतीय लष्करासह एनडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, ६० ते ७० जण वाहून गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.