esakal | ऑगस्टमध्ये लसीकरणाचा वेग वाढणार; आरोग्य मंत्र्यालयाची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccination

ऑगस्टमध्ये लसीकरणाचा वेग वाढणार; आरोग्य मंत्र्यालयाची ग्वाही

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र पुढील महिन्यापासून लसीकरणाचा वेग वाढण्याचे सूतोवाच केले आहे. पुढील महिन्यापासून स्पुटनिक व्ही या लसीशिवाय बायोलॉजिकल ई आणि झायडस कॅडिलाची लस उपलब्ध होणार असल्याने दररोज ८० लाखांहून अधिक डोसचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्याची ग्वाही देण्यात येत आहे. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी मोफत दिल्या जात आहेत.

हेही वाचा: प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

त्याबरोबरीने स्पुटनिक व्ही ही लस खासगी रुग्णालयांमधून दिली जात आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसीचे १२ कोटी डोस जुलैअखेरपर्यंत उपलब्ध होणार आहेत. तसेच झायडस कॅडिलाची लस तयार असून, त्यांना औषध महानियंत्रकांकडून मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बायोलॉजिकल ई लसीच्या चाचण्या पूर्ण होत आल्या असून, ऑगस्ट महिन्यापासून त्याचा पुरवठा होऊ शकेल, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
स्पुटनिक व्ही लसीचे वितरण देशाच्या विविध भागांत सुरू झाले आहे. या लसीचे उत्पादन हिमाचल प्रदेशात सुरू झाले आहे. याबरोबर मॉडर्ना, फायझर या लसीची आयात देखील सुरू होणार असल्याने ऑगस्ट महिन्यात लसीकरणाचा वेग वाढण्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. सध्या ३८ कोटी डोस देण्यात आले आहेत. परंतु कोरोनाला निष्प्रभ करायचे असेल, तर ऐंशी टक्क्यांहून अधिक जनतेचे लसीकरण झाले पाहिजे. त्यानुसार लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न आरोग्य मंत्रालयाकडून सुरू आहे.

हेही वाचा: थायलंडमध्ये बूस्टर डोस ॲस्ट्राझेनिकाचा; चीनच्या सिनोव्हॅकचा प्रभाव कमी

राजधानी दिल्लीत तुटवडा


राजधानी दिल्लीत लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने दिल्लीतील पाचशे लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागले आहेत. याबाबत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे, की आमच्याकडे लसीकरणाची क्षमता आहे. परंतु त्या तुलनेत लसीचा साठा उपलब्ध नाही. आता आमच्याकडे केवळ एक लाख ६८ हजार डोस आहे, ते उद्यापर्यंत संपतील. त्यानंतर मात्र दिल्लीत लसीचा तुटवडा भासू लागेल.

loading image