प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील कारचा अपघात, 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या

सकाळ ऑनलाइन टीम
Thursday, 4 February 2021

दिल्ली येथील ट्रॅक्टर परेडमध्ये मृत्यू झालेले शेतकरी नवरित सिंग यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी तिकडे जात होत्या.

रामपूर- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला आहे. हापूड रस्त्यावर ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रियांका गांधी या रामपूर जिल्ह्यात जात होत्या. दिल्ली येथील ट्रॅक्टर परेडमध्ये मृत्यू झालेले शेतकरी नवरित सिंग यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी त्या तिकडे जात होत्या. प्रियांका गांधी या गडमुक्तेश्वर रस्त्यावरुन गजरौलावरुन रामपूरला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, एक कारच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची परस्परांत धडक बसली. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही. 

दरम्यान, मृत नवरित सिंग यांच्याबाबत बोलताना उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू म्हणाले की, नवरित सिंग हे कॅनडा येथून आले होते. ते शांततेने आंदोलन करत होते. ट्रॅक्टर परेडदरम्यान त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे आम्हाला समजले. प्रियांका गांधी आज रामपूरमध्ये त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. 

हेही वाचा- 'या सेलिब्रिटीजना लक्झरीत बसवून आंदोलनस्थळी न्या'; संजय राऊतांनी व्यक्त केलं सडेतोड मत

ट्रॅक्टर परेडमध्ये झाला होता शेतकऱ्याचा मृत्यू
दि. 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकरी नवरित सिंग यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितले की, ट्रॅक्टर उलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी यासाठी सीसीटीव्ही फुटेजही जारी केले होते. परंतु, नवरितच्या नातेवाईकांनी गोळी लागल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. 

हेही वाचा- गडकरींच्या मंत्रालयाने तोडला जागतिक विक्रम; 24 तासांत बनवला सर्वाधिक लांबीचा रस्ता

पोस्टमॉर्टममध्ये गोळीचा उल्लेख नाही
या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केला होता. यात पोलिसांचे बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न करत असताना एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसते. नंतर त्या ट्रॅक्टरवर अनेकजण पडल्याचे व्हिडिओत दिसते. त्याचबरोबर पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये गोळी लागल्याचा उल्लेखच नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles in Congress leader Priyanka Gandhi Vadras cavalcade collided with each other on Hapur Road