'या सेलिब्रिटीजना लक्झरीत बसवून आंदोलनस्थळी न्या'; संजय राऊतांनी व्यक्त केलं सडेतोड मत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

देशातील प्रमुख मंडळी शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत कारण देशात भीती आणि दहशतीचं वातावरण आहे, असं त्यांनी म्हटलं.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेक अडचणींचा सामना करत हे आंदोलन शेतकऱ्यांनी मोठ्या निर्धारासह चालू ठेवलं आहे. सरकारसोबत शेतकऱ्यांच्या 10 बैठका होऊनही याबाबतचा तोडगा निघाला नाहीये. दरम्यान, या आंदोलनाला रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर गेल्या 70 दिवसापासून चिडीचूप असणारे भारतीय सेलिब्रिटी बोलत आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मत मांडलं आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सडेतोड मते मांडली आहेत.

संजय राऊत यांनी म्हटलं की, सेलिब्रिटीजच्या मतांवरती देशाची आंदोलने चालत नाहीत. जे शेतकरी गाझीपूरला बसलेले आहेत, ते ऐन थंडीत पावसात आंदोलन करत आहेत. त्यांच्याविषयी काही संवेदना व्यक्त केली जातेय का? ज्यांनी याबद्दल ट्विटरवर मत व्यक्त केलंय त्या सगळ्या सेलिब्रिटीजना  भारतीय जनता पक्षाने एक लक्झरी बस मध्ये बसवून गाझीपूर, सिघूं बॉर्डरला नेलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. पुढे त्यांनी म्हटलं की, त्यांना दाखवलं पाहिजे की, हजारो शेतकरी कोणत्या परिस्थितीत राहतायत. आणि  मग त्यांनी भावना व्यक्त करायला हव्यात. काही मोजके सोडले तर एकातरी सेलिब्रिटीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मत व्यक्त केलंय का, त्यांनी पिकवलेले अन्न तुम्ही खाता पण त्या शेतकऱ्यांचे प्रश्न कुणी जाणून घेतले नाहीयेत. ते जाणून घ्या आणि मग तुमची भुमिका मांडा. शेतकऱ्यांना जगभरातून पाठिंबा मिळतोय पण देशातील प्रमुख मंडळी तो द्यायला तयार नाहीत कारण देशात भीती आणि दहशतीचं वातावरण आहे, असं त्यांनी म्हटलं.

हेही वाचा - 'यामुळे प्रतिमा थोडीच सुधारेल?'; शशी थरुर यांचा सचिनच्या ट्विटवरुन सरकारवर पलटवार

जगभरातून एखाद्या आंदोलनाला पाठिंबा मिळणे म्हणजे हस्तक्षेप आहे, असं मी मानायला तयार नाहीये. जगात अनेक आंदोलनाला असा पाठिंबा मिळतो. आपणही दिला आहे. ज्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुळका भाजपला आता आलाय, त्यांनी स्वातंत्र्यासाठी जर्मनीला जाऊन मदत मागितली होती. आपण देखील मानवतेच्या जगातील लढ्यांना असाच पाठिंबा वेळोवेळी दिला आहे. श्रीलंका, आयर्लंडच्या लढ्यात आपण भुमिका घेतील आहे. यांना सेलिब्रिटी सामान्यांनी, कष्टकर्यांनी केलंय त्यांनी यांना डोक्यावर घेतलंय. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

याबाबत काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी मत मांडलं आहे. शशी थरुर यांनी म्हटलंय की, भारत सरकारने भारतीय सेलिब्रिटींना पाश्चिमात्त्य सेलिब्रिटींविरोधात प्रतिक्रिया द्यायला सांगणं हे लाजिरवाणं आहे. भारत सरकारच्या हट्टीपणामुळे आणि लोकशाहीविरोधी वर्तनाने तयार झालेल्या डागाळलेल्या भारताच्या जागतिक प्रतिमेला सुधारण्यासाठी एका क्रिकेटरच्या ट्विटचं उत्तर हा तोडगा असू शकत नाही. पेक्षा हे कृषी कायदे रद्द करा आणि शेतकऱ्यांसोबत तोडग्यासाठी चर्चा करा. तुम्हाला भारत एकत्र आलेला दिसेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut on celebrities campaign of india against propaganda