काश्‍मीरबाबतचे चिदंबरम यांचे वक्तव्य चुकीचे : नायडू

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

चिदंबरम यांचे विधान हे बेजबाबदार आणि देशविरोधी असे आहे. या प्रकारच्या विधानांमुळे पाकिस्तानला काश्‍मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यास बळ मिळते

हैदराबाद - काश्‍मीर भारताने गमाविले आहे हे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केलेले विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे केंद्रीय शहरी विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी आज येथे स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तेलंगण भाजपने येथे एका सभेचे आयोजन केले होते, त्यात वेंकय्या नायडू बोलत होते. त्या वेळी त्यांनी चिदंबरम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

चिदंबरम काल येथे एका सभेत बोलत होते. ते म्हणाले, की काश्‍मीर हे भारताने गमविल्यासारखे आपल्याला वाटत आहे, कारण तेथील असंतोष दाबून टाकण्यासाठी केंद्र सरकार जबरदस्तीने बळाचा वापर करीत आहे. नायडू म्हणाले, की चिदंबरम यांचे विधान हे बेजबाबदार आणि देशविरोधी असे आहे. या प्रकारच्या विधानांमुळे पाकिस्तानला काश्‍मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यास बळ मिळते, असे ते म्हणाले.

एका वृत्तपत्रातील क्‍लिपिंगबद्दल नायडू म्हणाले, की काश्‍मीरमधील जनता मोठ्या प्रमाणात महाशिवरात्र साजरी करीत आहेत. त्याशिवाय हुतात्मा झालेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विविध जाती- धर्मांचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातून हेच दिसते, की जम्मू काश्‍मीरमध्ये मैत्रीचा विजय झाला आहे.

Web Title: venkaiah naidu criticizes p chidambaram