esakal | बाबरी मशीद जमीनदोस्त होत होती आणि सुरक्षा दल निष्क्रीयपणे पाहत होतं!
sakal

बोलून बातमी शोधा

ayodhya verdict

अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त झाली ती अभूतपूर्व गोंधळ, कारसेवकांच्या अनियंत्रित गर्दीने केलेल्या कृतीने. जमाव एवढा बेभान होता, की सुरक्षा यंत्रणा, प्रशासन हातावर हात ठेवून निमूटपणे सर्व पाहत होते...निष्क्रियपणे...

बाबरी मशीद जमीनदोस्त होत होती आणि सुरक्षा दल निष्क्रीयपणे पाहत होतं!

sakal_logo
By
प्रताप आसबे

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजीची सकाळ. वादग्रस्त ऐतिहासिक बाबरी मशिदीसमोर कारसेवकांचा अथांग समुदाय. नजर जिथवर जाईल तिथवर. दोन-अडीच लाख! अख्खी अयोध्या कारसेवकमय. शिवाजीनगर, राणी लक्ष्मीबाईनगर, गुरू गोविंदनगर, कारसेवापुरम अशा वसवलेल्या नगरा-नगरांत हजारोंच्या कोऱ्या करकरीत तंबूत उतरलेले कारसेवक. तिथूनच आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र अशा राज्याराज्यांतले कारसेवक झुंडीझुंडीने मशिदीसमोर येऊन बसत होते. त्यातच गावागावातले बायाबाप्ये पुणे जिल्हा संघ कार्यवाह विनायकराव थोरात यांच्यासह होते. पार्श्वभूमीवर ""सियावर रामचंद्र की जय, मंदिर वही बनायेंगे'' हे कोरस. राम कथाकुंजच्या गच्चीवरील व्यासपीठावरून कर्कश सूचनांचा अखंड मारा... जिकडेतिकडे भगवे झेंडे, बॅनर... 

कारसेवेत काय होणार? असा मोठ्ठा प्रश्न. कल्याणसिंह सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत प्रतीकात्मक कारसेवेचे आश्वासन, तर सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रच दिले होते. तरीही हा प्रश्न. नोव्हेंबरच्या मध्यात "सेंटॉर'मध्ये उतरलेल्या मुलायमसिंह यादवांना विचारता ते म्हणाले होते, ""वह तो बाबरी मस्जिद नोंचनेवाले हैं, वह कुछ भी आश्वासन दे और ऍफिडेव्हिट दे, मस्जिद तोडकेही रहेंगे।'' हीच चर्चा सगळीकडे. त्यामुळे प्रश्न. 
सुरक्षारक्षकांसह आलेल्या फैजाबाद जिल्हादंडाधिकारी श्रीवास्तवांकडून परिसर पाहणी. बाबरी मशिदीभोवती लाकडी कुंपण. आत पीएसीचे (उत्तर प्रदेशातील प्रादेशिक सशस्त्र दल) जवान. कुंपणाबाहेर संघ स्वयंसेवकांचा पहारा. रामकथाकुंजच्या गच्चीवरून अशोक सिंघल भाषणाला उभे राहताच थेट "बीबीसी'चा उद्धार करत, "पत्रकार धादान्त खोट्या बातम्या देतात. त्यांनी कितीही खोट्या बातम्या दिल्या, तरी देशातील हिंदू एक आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. इ.इ.' 9.55 वाजता तिनेकशे साधू, संत, गोसावी शंखध्वनीच्या गोंगाटासह राम चबुतऱ्यावर येतात. मंत्रपठण, शंखध्वनी अन्‌ गदारोळ. दरम्यान, रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन, मुरली मनोहर जोशीप्रभृतींचे मधू चव्हाण, प्रकाश जावडेकर, किरीट सोमय्या अशा लवाजम्यासह आगमन. जमावाला हातवारे. मग तुंबळ घोषणा. रामकथाकुंजच्या जवळ एका बाजूला देशविदेशातील पत्रकार, छायाचित्रकार, टीव्ही कॅमेरे यांची ही गर्दी! जमावातूनही पत्रकारांना शिव्याशाप. सुरक्षा कडे तोडण्यासाठी झोंबाझोंबी. त्याकडे दुर्लक्ष करत रामकथाकुंजवर दस्तुरखुद्द अडवानी, ""दुनियाकी कोई ताकद अब राममंदिर के निर्माण को रोक नहीं सकती''. जल्लोष... ""मंदिर वही बनायेंगे. केंद्र सरकारने इसमें बाधाएँ लायी तो हम सरकार चलने नही देंगे''. पुन्हा जल्लोष. ""जो शहीद होने के लिए आये हैं, उन्हें शहीद होने दो''. गगनभेदी जल्लोष. ""जिनके भाग में राम चरणों में जाना हैं, उन्हें राम के चरणों में जाने दो. उन्हे शहीद होने दो''. 

सत्ता स्थापनेचं निमंत्रण भाजप स्वीकारणार का?

वाक्‍यावाक्‍याने कारसेवकांत ज्वालाग्राही प्रक्षोभ. साधू, संतांचे शिव्याशाप. पत्रकारांच्या घोळक्‍यात घुसून एका साधूची व्हॉइस ऑफ अमेरिकेच्या पत्रकाराला मारहाण. पाठोपाठ "टाइम' मासिकाच्या पत्रकाराला फटके. मग "बीबीसी'चे मार्क टलींना प्रसाद अन्‌ मग दिसेल त्याला चोप. जो-तो पळत सुटल्यावर सापडले ते टीव्हीचे कॅमेरामन. त्यांचे दहा-दहा किलोंचे साठ-सत्तर कॅमेरे राम चबुतऱ्याच्या कॉंक्रिटवर आपटून चक्काचूर. घटनेचे छायाचित्रण होणार नाही, अशी चोख व्यवस्था. मारहाणीच्या पार्श्‍वभूमीवर अडवानींचे लवाजम्यासह मैदानात आगमन. गदारोळ वाढतच चालला. तेवढ्यात कारसेवकांच्या झुंडी मशिदीकडे धावू लागल्या. दिसेल त्याला तुडवत. क्षणार्धात सुरक्षारक्षकांसह अडवानींचा लवाजमा इकडेतिकडे. कार्यकर्ते सुरक्षारक्षक सगळेच बेपत्ता. पुढच्या दोन-एक मिनिटांत धक्काबुक्की करत सुरक्षारक्षक आले आणि अडवानींना घेऊन गेले. 
कारसेवक सैरावैरा धावतानाच तुफान दगडफेक सुरू झाली. "पीएसी'चे काही जवान, अधिकारी जखमी झाले. मशिदीच्या बंदोबस्ताचे जवान बचावासाठी बाजूला झाले. दगडफेक थांबवा कारसेवक जखमी होताहेत, या आवाहनापाठोपाठ दगडफेक थांबते. मशिदीजवळ पोचलेले कारसेवक लाकडी कुंपण तोडून आत घुसतात. शेजारच्या नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निर्विकारपणे हे बघत असतात. मशिदीत रामलल्लाच्या मूर्तीजवळ विनयकुमार पांडे हा पुजाऱ्याचा पोऱ्या होता. कारसेवक त्याला मारून मूर्ती घेऊन जातात. जखमी जवान त्याला नियंत्रण कक्षात आणतो. आता थेट लाउडस्पीकरवरून, ""पुलिस को अनुरोध हैं की वह किसी भी हालत में हस्तक्षेप ना करें'', असे आवाहन. जमावात ढोलकी, टाळ अवतरतात. जमाव त्यांच्या तालावर नाचायला लागतो. कारसेवक चोहोबाजूने मशिदीवर चढू लागतात. घुमटांवर चढाई करतात. मशीद पाडायला सुरुवात होते. लगेचच कुदळी, फावडी, पाहरी, टिकाव, कोरेकरकरीत दोरखंड दिमतीला येतात. बेभान कारसेवक एकापाठोपाठ एक घाव घालतात. पाचशे वर्षांपासून ऊनपाऊस खाल्लेल्या वास्तूला भगदाडे पडू लागली. कारसेवक नाचायला लागतात. माईकवरून, ""सियावर रामचंद्र की जय, मंदिर वही बनायेंगे'', या घोषणांनी आसमंत दणाणायला लागतो. शंखध्वनी घुमतो. कारसेवक पडून जखमी होतात. त्यांना लगोलग मशिदीमागे उपचारासाठी नेतात. गडबड सुरू झाल्यानंतर तासाभराने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी "सीआरपीएफ'कडे मदत मागितली. पोलिस उपमहानिरीक्षक वायरलेसवरून "सीआरपीएफ'ला सज्जतेचा आदेश देतात. "विहिंप'चे संतप्त नेते लगेच स्टेजवरून जमावाला आदेश देतात, ""रस्ते आडवा. अडथळे उभे करा. "सीआरपीएफ'चा एकही जवान अयोध्येत येता कामा नये, खबरदारी घ्या.'' कारसेवकांनी रस्तोरस्ती अडथळे उभारले.

शिवसेना, काँग्रेसला घोडेबाजाराची भीती?

आता दुप्पट जोमाने चोहोबाजूने संघटितपणे युद्धपातळीवर मशीद पाडणे सुरू झाले. एव्हाना मुरली मनोहर जोशी राम चबुतऱ्याजवळच्या खुर्चीवर बसलेले. त्यांच्यामागे उमा भारतींसह काही कार्यकर्ते. बाजूलाच पत्रकारही होते. घोषणा, गोंगाट-गदारोळात सगळ्यांचे लक्ष मशिदीकडे होते. बरोबर पावणेतीन वाजता मशिदीचा पहिला घुमट कोसळला. पराकोटीचा जल्लोष झाला. उमा भारतींनी आनंदातिशयाने जोशींना मागून मिठीच मारली. आता साध्वी ऋतंभरा माईक हाती घेऊन, ""एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो. एक धक्का और दो, कलंक ढांचा तोड दो'' अशा घोषणा देऊ लागतात. सलग साडेतीन तास त्या घोषणा देत होत्या. जिल्हा दंडाधिकारी नियंत्रण कक्षातून लखनौमधील मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना वेळोवेळी माहिती देत होते. कारसेवकांवर कोणत्याही स्थितीत गोळीबार करायचा नाही, असे कल्याणसिंह बजावत होते. चार वाजण्याच्या सुमारास मशिदीचा दुसरा घुमट पडला आणि सायंकाळी 4.46 वाजता तिसरा आणि अखेरचा घुमट जमीनदोस्त झाला. धुळीच्या लोटासह बाबरी मशीद इतिहासजमा झाली. 

एसपीजी सुरक्षा काढली, सोनिया गांधींनी मानले आभार!

शेवटचा तिसरा घुमट कोसळताच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली, तसे ते नियंत्रण कक्षातून निघून गेले. बाबरी मशिदीची मोहीम फत्ते होताच लखनौमध्ये कल्याणसिंह लगेच 4.50 वाजता राजीनाम्याचा निर्णय जाहीर करतात. गुप्तचर विभागाचे अधिकारी सकाळपासूनच फॅक्‍सद्वारे पंतप्रधान कार्यालयाला माहिती देत होते, तर निरीक्षक तेजशंकर वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाला अहवाल पाठवत होते. दिवसभरात जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना एकही आदेश दिला नाही. या अभूतपूर्व घडामोडीत केंद्र सरकारने कोणताही आदेश जारी केला नाही. कल्याणसिंहांच्या राजीनाम्यानंतरच उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मशीद पाडल्यावर घरेदारे, दुकाने पेटू लागली. अयोध्याभर लुटालूट, जाळपोळ सुरू झाली. मशिदीचे ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालू असतानाच एका ठिकाणी सिमेंटचा चौथरा बांधून रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाजूने भिंती उभ्या करून रातोरात मंदिर उभारले गेले. विधिवत पूजाअर्चा सुरू झाली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर तब्बल 36 तासांनी "सीआरपीएफ'ने परिसराचा ताबा घेतला. 

loading image