नाट्य, साहित्य क्षेत्रातील अध्वर्यू हरपला; गिरीश कार्नाड यांचे निधन 

Girish Karnad
Girish Karnad


बंगळूर : सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कलाकार गिरीश कार्नाड (वय 81) यांचे सोमवारी (ता. 10) सकाळी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शहरातील लेव्हले रोडवरील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

डॉ. कार्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये महाराष्ट्रातील माथेरानमध्ये झाला होता. साठच्या दशकातील प्रमुख नाट्यकलाकारांपैकी ते एक होते. या कालखंडात भारतीय नाट्यसृष्टीचे पुनरुज्जीवन झाले. त्यांनी पौराणिक कथा आणि इतिहासाला उजळणी देण्याचे काम केले. "तुघलक' आणि "हयवदन' सारख्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. "रक्षसा तंगाडी' हे त्यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले नाटक होते. ते चित्रपट व नाटकांचे दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. केवळ समांतर कन्नड सिनेमातच नव्हे, तर विविध भाषांतील चित्रपटातही त्यांनी काम केले. "मंथन' आणि "संस्कार'सारख्या चित्रपटांत त्यांनी केलेला अभिनय अद्यापही नावाजला जातो. "उत्सव' आणि "काडू' या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

थोर विचारवंत, समाज सुधारक व बुद्धीवादी म्हणून कार्नाड ओळखले जात होते. काही समाजकंटकांनी त्यांना लक्ष्य बनविले होते. टिपू सुलतानबद्दलच्या विचारांमुळे काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर टीका सुरू केली होती. गौरी लंकेश यांची हत्या केलेल्या समाजकंटकांच्या हिटलिस्टवर त्यांचे नाव होते. गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर राज्य पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. 

तीन दिवस दुखवटा 
डॉ. गिरीश कार्नाड यांच्या निधनानंतर कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्‍त केला. तसेच सोमवारी एक दिवस सार्वजनिक सुटी घोषित करण्यात आली. 

चार फिल्मफेअर पुरस्कार 
सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून गिरीश कार्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी "कानुरू हेगाडीथी' (1999) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर "इक्‍बाल' (2005) आणि लाइफ गोज ऑन (2009), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून, त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंशवृक्ष (1972), काडू (1974), ओन्दानुंडू कालाडल्ली (1978) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि गोधुली (1980) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय "उंबरठा' या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. "संस्कार' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हयवदन, तुघलक, नागमंडल या नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रांत छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे कलावंत म्हणूनही ते ओळखले जायचे. गिरीश कार्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. 

ख्यातनाम नाट्यकर्मी, साहित्यिक गिरीश कार्नाड यांच्याबद्दलच्या आठवणी "सकाळ'सोबत जागवताना अनेक मान्यवरांनी कार्नाड यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल आवर्जून सांगितले. 

बहुआयामी, अभ्यासू माणूस 
- एस. एल. भैरप्पा (कन्नड साहित्यिक) 

कधीही थाट करून न घेणारा बुद्धिवादी कलाकार. शैक्षणिक दृष्टी, स्वतंत्र अस्तित्व जपणारा, निर्भीड. 
- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते 

आधुनिकतेचा प्रवक्ता 
इतिहास, पौराणिक व मिथकांमध्ये रस असलेला नाटककार. समृद्ध व्यक्तिमत्त्व. आधुनिकतेचा प्रवक्ता. आविष्कार, लेखन व कलावंतांचे स्वातंत्र्यप्रिय. 
- डॉ. जब्बार पटेल, दिग्दर्शक 

बुद्धिवान, सज्जन. मिथकांना समकालीन संदर्भ देणारा नाटककार. उदयोन्मुख लेखकांना प्रमाणिकपणे मदत करणारा चांगला मित्र, तत्त्वज्ञ. 
- सतीश आळेकर, नाटककार 

स्पष्टवक्तेपणा, मनमोकळा स्वभाव, मैत्रीपूर्ण संबंध. 
- भूपेंद्र कैंथोला, संचालक, एफटीआयआय 

बहुआयामी व्यक्तिमत्त्व. वैचारिक क्षेत्रातही विशेष स्थान. 
- गिरीश बापट, खासदार 

आत्मचरित्र अनुवादित केल्याने फायदा 
गिरीश कार्नाड यांचे "खेळता-खेळता आयुष्य' हे आत्मचरित्र मी मराठीत अनुवादित केले. त्यासोबतच नागमंडल, ययाती, टिपू सुलतानचे आयुष्य, ही नाटकेसुद्धा अनुवादित केली. इतर अनेक कानडी लेखकांना मराठी येत नाही; परंतु कार्नाड यांना मराठी येत असल्याने ते स्वत:हून लेखन पाहायचे. त्याबद्दल सूचना आणि मार्गदर्शन करायचे; परंतु माझी सूचना ऐकायलाच हवी, असा हट्ट त्यांनी कधीच ठेवला नाही. कार्नाड प्रस्थापित होते, लोकांना ते माहिती होते. त्यामुळे त्यांची नाटके, आत्मचरित्र अनुवादित केल्यानंतर मला जास्त फायदा झाला. 
- उमा कुलकर्णी, (गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्राच्या अनुवादक) 

आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व 
भारतीय साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी या तिन्हीवर आपला अमिट ठसा उमटविणारे गिरीश कार्नाड यांचा माझ्याशी जवळचा संबंध आला, तो त्यांच्या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादामुळे. पुस्तकाचे नाव बघा "खेळता खेळता आयुष्य'. वरवर पाहता "आयुष्य म्हणजे माझ्यासाठी जणू एक खेळच होता,' असा त्याचा अर्थ आहे; पण त्याचा मर्मभेदी गाभा असा आहे की, "आयुष्यभर मी लिहिले, नाटक केले, सिनेमा केला; पण हे करण्यातच खरे आयुष्य जगण्याचे राहून गेले. "लाइफ जस्ट स्लीप्ड अवे.' पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अर्पण पत्रिका. कार्नाड यांनी हे आत्मचरित्र पुण्याच्या सुप्रसिद्ध प्रसूतितज्ज्ञ डॉ. मधुमालती गुणे यांना अर्पण केले होते. तीन अपत्यांनंतर कार्नाड यांची आई गिरीश यांच्यावेळी गरोदर होती. आता हे मूल नको, या विचाराने त्यांच्या आई-वडिलांनी गर्भपाताचा निर्णय घेतला होता. ते डॉ. गुणे यांच्याकडे गेले. मात्र, काही अडचणींमुळे डॉ. गुणे वेळेत न आल्याने कंटाळून जाऊन त्यांनी निर्णय बदलला अन्‌ "गिरीश'चा जन्म झाला. त्या दिवशी वेळेत न येणाऱ्या डॉक्‍टरबाईंनाच ही कथा त्यांनी अर्पण केली होती. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व, या आत्मचरित्रामुळे जवळून पाहता आले आणि विविध प्रसंगांतून ते मनावर ठसा उमटवत गेले. 
- दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com