हा विकास व सुशासनाचा विजय- पंतप्रधान मोदी

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

मोदींनी ट्विट करून विधानसभा निवडणुकांमधील भाजपचा हा जबरदस्त विजय असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : भाजपवर विश्वास कायम ठेवल्याबद्दल भारताच्या जनतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. "भाजपचा हा ऐतिहासिक विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

मोदींनी ट्विट करून विधानसभा निवडणुकांमधील भाजपचा हा जबरदस्त विजय असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 
"भाजपवर सातत्यपूर्ण विश्वास, पाठिंबा आणि प्रेम दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेला मी अंतकरणापासून धन्यवाद देतो."

"आमच्या काळातील प्रत्येक क्षण आणि आमची प्रत्येक कृती भाताच्या जनतेच्या कल्याणासाठी आहे. आमचा 125 कोटी जनतेच्या शक्तीवर विश्वास आहे."

भाजपला समाजाच्या सर्व घटकांतून अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. तरुणांकडून मिळणारा पाठिंबा आनंददायी आहे. मी भाजप कार्यकर्त्यांच्या कष्टाला सलाम करतो. त्यांनी शेवटच्या स्तरापर्यंत अथक परिश्रम घेऊन लोकांचा विश्वास जिंकला," असे मोदींनी म्हटले आहे.

देवभूमी खास
उत्तराखंडचा विजय हा अत्यंत खास आहे. देवभूमीच्या लोकांचे आभार. मी विश्वास देतो की भाजप पूर्ण तत्परतेने आणि कर्मठपणे लोकांची सेवा करेल.

काशीच्या जनतेला अभिवादन
'काशीचा खासदार म्हणून काशीच्या जनतेचे जो अतुट विश्वास आणि अपार प्रेम मिळाले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. काशीच्या लोकांना शतशः प्रणाम.'

पंजाबी 'कॅप्टन'चे अभिनंदन
पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे फोनवरून अभिनंदन केले. तसेच, अमरिंदर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 
पंजाबी जनतेने शिरोमणी अकाली दल आणि भाजपला आतापर्यंत दहा वर्षे सेवा करण्याची दिलेल्या संधीबद्दल आणि या निवडणुकांत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. 

पक्षाला नव्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पक्षाचे पदाधिकारी आणि प्रादेशिक पक्ष संघटनांचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले. 
 

Web Title: victory of development and governance, says pm narendra modi